Translate this blog

banner

Saturday, August 20, 2011

ट्रेक सुधागड (७ जुलै २०११)


सुधागड 
कळसूबाईच्या यशस्वी ट्रेक नंतर पाउलवाटा ग्रुपचा हा दुसरा ट्रेक.. ट्रेक सुधागड (२०३० फुट)

या वेळेस आमच्या डोक्यात वेगळीच कल्पना होती, की हा ट्रेक बाईकवरून करायचा तसे प्लान्निंग हि झाले पण ऐन वेळेवर ठरवल्यापेक्षा जास्त सभासद जमा झाल्याने आम्ही मुंबईहून (चेम्बुर) मकरंदची ओम्नी गाडी करायचे ठरवले. आणि तसेच प्लान करून निघालो. इथे कल्याणवरून मी आणि विष्णू माझ्या बाईकवरून निघालो, तिकडे विजय आणि रविंद्र त्याची बाईक घेऊन येणार होते.
ठरवल्याप्रमाणे राउट सेट करून ७ जुलैला सकाळी ५ वाजता मी आणि विष्णू निघालो आणि तिकडे माधव आणि मंडळी मुंबईहून निघाले. कळंबोलीला आम्ही सगळे भेटलो आणि पुढचा प्रवास एकत्र केला. आमचा पुढचा स्टोप होता खोपोली. विजय,रवि पाली फाट्यावर भेटले...
सकाळी ९.३० वाजता पालीच्या गणपतीचे दर्शन घेतले, चहा नास्ता करून आम्ही सुधागडचा प्रवास सुरु केला. पाली मंदिराच्या बाहेरून जो मार्ग जातो तो सरळ सुधागाडला जातो. साधारणतः ८ किलो मीटर पुढे गेल्यावर दोंडसे फाटा लागतो तिथून डाव्या बाजूच्या रस्त्याने सरळ जावे लागते, पात्शापूर/ ठाकूरवाडी रस्ता पकडून आम्ही मार्गक्रमण करत निघालो. पालीपासून जवळजवळ १३ किलो मीटरवर ठाकूरवाडी हे गाव आहे. गाव छोटेसे असून होटेल ची सुविधा नाही, त्यामुळे दुपारी जेवणाचा डबा घेऊन निघणेच हिताचे. एक किराणा मालाचे दुकान असून तिथेच चहा मिळतो.
सकाळ असल्याने वातावरण पण स्वच्छ आणि प्रसन्न होते मुळात म्हणजे पाउस नव्हता.
गावातूनच किल्ल्यावर जायचा मार्ग आहे तसे पाहता पाच्छापूरहून(पातशहापूर)सुद्धा मार्ग आहे, आम्ही निवडला ठाकूरवाडी.

सुधागड किल्ल्याला ऐतेहासिक वारसा आहे. ह्या किल्ल्याला रायगडाची प्रतिकृती असे देखील म्हणतात. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.

इतिहास

सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ. स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरूनसुधागड असे नामकरण केले.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणार्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.

पहाण्यासारखी ठिकाणे

वाडा
या गडाचा घेरा मोठा आहे.गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात.गडावर पंत सचिवांचा वाडा आहे.तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. येथे जंगलही ब-यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाडापासून पुढे पाय-यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात . जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाके आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे जाते. ही वाट मात्र आता अस्तित्वात नाही.
  • पाच्छापूर दरवाजा : या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.
  • गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते.या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबा नदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.
चोर वाट 
  • दिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम आहे.

गडावर जाण्याच्या वाटा
    भोराई देवी
  • सवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे.तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात.या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो.
  • नाणदांड घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळती कडे निघावे.पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो.पुढे एक बावधान गाव आहे. पुढे पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो.


किल्ला तसा चढायला सोप्पा आहे. आम्ही जवळजवळ पाऊण तासात किल्ला सर् केला. आर्धा डोंगर सर् केला कि किल्ल्यावर जायला एक लोखंडी शिडी लागते, चढायला खुपच सोप्पी आणि सेफ अशी शिडी आहे.
फोटो काढत आम्ही पुढे पुढे जात होतो. काही वेळातच आम्ही वर आलो. किल्ला तसा खूप प्रशस्त आहे. तसेच किल्ल्यावर जुने बांधकाम् आढळते. वरती टकमक टोक, शिव मंदिर, पाण्याचे तळे, भोराई देवीचे मंदिर, महादरवाजा आहे. किल्ल्याला बुरुज आणि चोरवाटा आहेत. रस्ता बंद असल्याने आम्हाला महादरवाज्यात जाता नाही आले. माहिती मिळाल्याप्रमाणे दरवर्षी सुधागडावर भोराई देवीची यात्रा होते.

दुपारी वरती असलेल्या वाड्यात चहा आणि जेवण केले. (वर वाड्यात चहाची सोय होते.)
रिमझिम पाऊसात आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली. माधवने सोबत आणलेला आमचा खास पाहुणा (घोणस) तिथल्या दरीत सोडून संध्याकाळी ७ वाजता खाली उतरलो आणि फ्रेश होऊन आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो.
एकूण खर्च प्रत्येकी रुपये ३००/-(अंदाजे) ज्यात पेट्रोल, दुपारचे जेवण,चहा आणि नास्ता सामील आहे.  

सामील गडी:
निशांत, विष्णू (कल्याण)
रविंद्र, विजय (खोपोली)
माधव,मकरंद,मंदार,हर्षला,सोनल,मीनल,परणील .(मुंबई)






View Larger Map

No comments:

Post a Comment