६ जानेवारी २०१३
नवश्या गणपती, नाशिक
जवळच्या नातेवाइकाच्या लग्नाच्या निमित्ताने मला नाशिकला जायचा योग आला, सोबत बायको होती,म्हटले चला जाऊया गणपतीच्या दर्शनाला. माझा मित्र निलेश त्याची पत्नी प्रियांका आणि आम्ही दोघे असे कार्यक्रम आटपून दर्शनाला निघालो.
इंदिरा नगर नंतर अंबड सोडून पुढे नाशिक MIDC आतल्या रस्त्याने आम्ही नवश्या गणपतीच्या दर्शनाला आलो. रात्री पारा बराच खाली उतरला होता जवळ जवळ १० degree होता आणि रात्रीचे ९ वाजले होते.
मंदिराजवळ खूप शांतता होती बाहेरच गाडी उभी करून आम्ही दर्शनाला निघालो. नवश्या गणपतीचे नाव खूप ऐकले होते पण जाण्याचा योग काही येत नव्हता तो आज आला तो पण जोडीने.
मंदिरा बद्दल जी माहिती मिळाली ती अशी.. आणि थोडी फार माहिती इंटरनेट वरून मिळाली.
पेशवे कालीन ऐतीहासिक नवश्या गणपती मंदिर हे आनंदवल्ली येथील अत्यंत जागृत असे देवस्थान आहे. नवश्या गणपती हा नवसाला पावतो असा अनुभव हजारो भाविकांना आलेला आहे. ह्या मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे.
इ.स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी ह्या मंदिराची स्थापना केली होती. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवल्ली हे गाव आजोळ होते व त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई ह्या देखिल नवश्या गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या.
राघोबा दादा व आनंदीबाई ह्यांना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झला व त्याचे नाव विनायक असे ठेवण्यात आले. ह्या मुलाच्या जन्मप्रित्यर्थ चावंडस गावाचे नाव बदलून आनंदवल्ली असे ठेवण्यात आले. ह्याच दरम्यान नवश्या गणपतीच्या मंदिराची उभारणी सुरु झाली. गोदावरीच्या तीरी पुर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेशाची मुर्ती आहे.
मुर्तीचे डोळे अतीशय सजीव असून मुर्ती आकर्षक आहे. ह्या गणेशाला चार हात असून त्यात पाश, मोदक, फूल आहे व चौथा हात आशीर्वाद दर्शविणारा आहे. प्रत्येक हातात कडे आहे. मूळ मुर्तीच्या डोक्यावर मुकूट आहे.
राघोबा दादांनी आनंदवल्ली येथे राजवाडाही बांधला होता, राजवाड्यात पश्विमेस उभे राहिल्यावर श्री नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडवली व राजवाडा जाळून टाकला. मात्र परीसरातील मंदिरे शाबूत राहिली. श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या करकिर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे.
मंदिराचा पत्ता: श्री नवश्या गणपती मंदीर, गंगापूर रोड, आनंदवल्ली, नाशिक
असे म्हणतात कि आपला नवस बाप्पाच्या कृपेने पूर्ण झाल्यास मंदिरात घण्टा बांधतात. अश्या अनेक घंटा मंदिरात आपल्याला दिसतात. मंदिराचे काढलेले काही फोटो आपल्यासोबत शेअर करत आहे.
नवश्या गणपती |
धन्यवाद...
निशांत पोतदार
No comments:
Post a Comment