Translate this blog

banner

Saturday, December 21, 2013

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर



श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

मा‍झ्या प्रिय वाचकांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपणास घेऊन जात आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे.

"गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश ।
वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास ।
त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ॥ १० ॥”

नाशिक पासून ३५ किलोमीटरच्या अंतरावर त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अति प्राचीन असे पवित्र क्षेत्र आहे. देशभरातले अनेक भाविक आपल्या पितरांना शांती मिळावी तसेच आपली उन्नती व्हावी म्हणून या ठिकाणी सतत भेट देत असतात. असाच योग मला आला आणि एक दिवस आम्ही पती पत्नी दर्शनाला निघालो. ३ दिवसांच्या भेटीमध्ये मी अनेक वेळा मंदिर न्याहाळून घेतले. प्रत्येक काळात मंदिराचा कळस खुलून दिसत होता. सकाळी वेगळे रुप, दुपारचे वेगळे आणि संध्याकाळी काळी तर खूपच सुंदर होते. फोटो काढण्याचा तर मोह आवरलाच जात नव्हता. 
 बारीक कोरीव काम करणाऱ्या त्या पेशवे कालीन कामगारांना दाद द्यावी लागेल. मा‍झ्या मते अप्रतिम कोरीव काम आणि सौंदर्य याचे उदाहरण म्हणजे हे मंदिर. भगवान शंकराच्या बारा जोतीर्लींगामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराचे दहावे स्थान आहे. हे महादेवाचे मंदिर गौतमी नदीच्या तटावर असून ब्रम्ह गिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे.
इंटरनेट वर मला मिळालेली माहिती:
त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. 
नानासाहेब पेशवे यांनी .. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला
ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.
येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ(?) आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.
भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात .
गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः तांदूळ नाचणी ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.
असे म्हणतात की मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी कुशावर्तात अंघोळ करतात, त्या मागे एक कथा आहे ती अशी:
एकदा या क्षेत्रात दुष्काळ पडला होता. लोग घाबरून सैरभैर झाले होते तेव्हा गौतम ऋषींनी वरून देवाची आराधना करण्यास सुरवात केली त्यावर प्रसन्न होऊन वरुण देवाने एक खड्डा खोदावयास सांगितले. त्यात आपोआपच पाणी भरू लागले. काही दिवसांनंतर गौतम ऋषींचे शिष्य थेथे पाणी भरायला गेले, त्याच वेळेस इतर ऋषींच्या पत्नी पण पाणी भरण्यास गेल्या आणि पाणी आधी भरण्यास हट्ट करू लागल्या. त्यात गौतम ऋषींच्या पत्नीने हस्तक्षेप करून शिष्यांना पाणी भरण्यास सांगितले. त्यामुळे नाराज झालेल्या ऋषी पत्नींनी त्यांच्या पतीस गौतम ऋषींच्या विरुद्ध भडकावणे सुरू केले. तेव्हा सर्व ऋषींनी एकत्र येऊन गणपतीची आराधना करून गौतम ऋषींचे अरिष्ट होण्याचा वर मागितला. गणपतीने असा वर न मागण्याचे सांगीतले परंतु ऋषींनी त्याचे ऐकले नाही. काही दिवसांनी गौतम ऋषी एका आजारी गाईला हटवण्यास गेले असता ती गाय मेली आणि गौतम ऋषींना गोहत्तेचे पातक लागले. नाराज मुनींनी ते स्थान सोडून तप करण्यास गेले आणि शिवाची आराधना सुरू केली. त्यावर शंकर प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले.
गौतमाने शंकरास गंगा मागून सर्व जीवांचे भले करण्याचा वर मागितला. त्यानंतर गंगेकडे गोहत्येच्या पाप पासून मुक्त होण्याचा आशीर्वाद मागितला. गंगेने गौतम ऋषींस प्रसन्न होऊन स्वर्गात चालण्यास सांगितले असता भगवान शंकराने त्यांना पृथ्वीवर राहण्याचा आदेश दिला. त्यावर गंगेने महादेवास पार्वतीसह पृथ्वीवर राहण्याची प्रार्थना केली. त्यावर शंकराने गंगेची प्रार्थना स्वीकार करून सृष्टीच्या भल्यासाठी पार्वतीसह पृथ्वीवर वास केला. तेव्हापासून गंगा गौतमी नावाने प्रसिद्ध झाली आणि लिंग त्र्यंबक नावाने.
गोदान केल्या मुळे गौतमी गोदावरी नावाने प्रसिद्ध झाली. गंगाद्वारातून निघून गोदावरी थोडी दूर जाऊन लुप्त होते आणि नंतर पर्वताखाली प्रकट होते. नदी पुन्हा लुप्त होऊ नये म्हणून गौतमांनी चारी दिशांना दुर्वा फेकून पाण्यास कुशावर्तातून वाहण्यास भाग पाडले. कुशावर्ताजवळ गंगासागर तलाव आहे. निवृत्तीनाथांची समाधी आणि गोरक्ष गुहा जवळच आहेत.
प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वराची पालखी गाजवाजात कुशावर्तावर नेली जाते आणि परत आणली जाते. इथेच अहिल्या नावाची छोटी नदी गोदावरीला मिळते, याचा संगमावर निपुत्रिक लोक संतान प्राप्तीसाठी पूजा करतात.
सिंहस्थ कुंभमेळा:
असे मानतात की समुद्र मंथनाच्या वेळेस जो अमृत कुंभ मिळाला त्यातले काही थेंब उज्जैन, हरिद्वार आणि प्रयाग क्षेत्रासोबत त्र्यंबकेश्वर येथे पडले होते. म्हणून प्रत्येक बारा वर्षांनी जेव्हा गुरु सिंह राशीत असतो तेव्हा त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा लागतो.

जवळच ४ किलोमीटर वर श्री स्वामी समर्थांचे दिंडोरी प्रणित गुरूपीठ आहे तेथे आवर्जून भेट द्यावी. तुम्हाला नक्की आवडेल. पुढच्या लेखात आपण गुरुपीठाची माहिती बघूया.

त्र्यंबकेश्वर येथे कसे जावे:
तुम्ही जर मुंबईहून येणार असाल तर कसारा घाटातून इगतपुरी मार्गे आणि कल्याण बायपास येथून भिवंडी-वाडा मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे.
रेल्वे ने जाणार असाल तर:
११.      सकाळची कसारा ट्रेन पकडून कसाऱ्याला जावे, बस किंवा जीप ने नाशिक बस डेपोला जाणे तेथून त्र्यंबकेश्वर बसेस लागतात.
२२.      पुणे मनमाड पसेंजर ट्रेन ने नाशिक रोड येथे जाणे आणि तेथून रिक्षा/बसची सुविधा आहे.

धन्यवाद.

निशांत पोतदार


No comments:

Post a Comment