Translate this blog

banner

Saturday, December 21, 2013

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर



श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

मा‍झ्या प्रिय वाचकांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपणास घेऊन जात आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे.

"गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश ।
वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास ।
त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ॥ १० ॥”

नाशिक पासून ३५ किलोमीटरच्या अंतरावर त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अति प्राचीन असे पवित्र क्षेत्र आहे. देशभरातले अनेक भाविक आपल्या पितरांना शांती मिळावी तसेच आपली उन्नती व्हावी म्हणून या ठिकाणी सतत भेट देत असतात. असाच योग मला आला आणि एक दिवस आम्ही पती पत्नी दर्शनाला निघालो. ३ दिवसांच्या भेटीमध्ये मी अनेक वेळा मंदिर न्याहाळून घेतले. प्रत्येक काळात मंदिराचा कळस खुलून दिसत होता. सकाळी वेगळे रुप, दुपारचे वेगळे आणि संध्याकाळी काळी तर खूपच सुंदर होते. फोटो काढण्याचा तर मोह आवरलाच जात नव्हता. 
 बारीक कोरीव काम करणाऱ्या त्या पेशवे कालीन कामगारांना दाद द्यावी लागेल. मा‍झ्या मते अप्रतिम कोरीव काम आणि सौंदर्य याचे उदाहरण म्हणजे हे मंदिर. भगवान शंकराच्या बारा जोतीर्लींगामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराचे दहावे स्थान आहे. हे महादेवाचे मंदिर गौतमी नदीच्या तटावर असून ब्रम्ह गिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे.
इंटरनेट वर मला मिळालेली माहिती:
त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. 
नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला
ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.
येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ(?) आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.
भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात .
गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः तांदूळ व नाचणी ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.
असे म्हणतात की मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी कुशावर्तात अंघोळ करतात, त्या मागे एक कथा आहे ती अशी:
एकदा या क्षेत्रात दुष्काळ पडला होता. लोग घाबरून सैरभैर झाले होते तेव्हा गौतम ऋषींनी वरून देवाची आराधना करण्यास सुरवात केली त्यावर प्रसन्न होऊन वरुण देवाने एक खड्डा खोदावयास सांगितले. त्यात आपोआपच पाणी भरू लागले. काही दिवसांनंतर गौतम ऋषींचे शिष्य थेथे पाणी भरायला गेले, त्याच वेळेस इतर ऋषींच्या पत्नी पण पाणी भरण्यास गेल्या आणि पाणी आधी भरण्यास हट्ट करू लागल्या. त्यात गौतम ऋषींच्या पत्नीने हस्तक्षेप करून शिष्यांना पाणी भरण्यास सांगितले. त्यामुळे नाराज झालेल्या ऋषी पत्नींनी त्यांच्या पतीस गौतम ऋषींच्या विरुद्ध भडकावणे सुरू केले. तेव्हा सर्व ऋषींनी एकत्र येऊन गणपतीची आराधना करून गौतम ऋषींचे अरिष्ट होण्याचा वर मागितला. गणपतीने असा वर न मागण्याचे सांगीतले परंतु ऋषींनी त्याचे ऐकले नाही. काही दिवसांनी गौतम ऋषी एका आजारी गाईला हटवण्यास गेले असता ती गाय मेली आणि गौतम ऋषींना गोहत्तेचे पातक लागले. नाराज मुनींनी ते स्थान सोडून तप करण्यास गेले आणि शिवाची आराधना सुरू केली. त्यावर शंकर प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले.
गौतमाने शंकरास गंगा मागून सर्व जीवांचे भले करण्याचा वर मागितला. त्यानंतर गंगेकडे गोहत्येच्या पाप पासून मुक्त होण्याचा आशीर्वाद मागितला. गंगेने गौतम ऋषींस प्रसन्न होऊन स्वर्गात चालण्यास सांगितले असता भगवान शंकराने त्यांना पृथ्वीवर राहण्याचा आदेश दिला. त्यावर गंगेने महादेवास पार्वतीसह पृथ्वीवर राहण्याची प्रार्थना केली. त्यावर शंकराने गंगेची प्रार्थना स्वीकार करून सृष्टीच्या भल्यासाठी पार्वतीसह पृथ्वीवर वास केला. तेव्हापासून गंगा गौतमी नावाने प्रसिद्ध झाली आणि लिंग त्र्यंबक नावाने.
गोदान केल्या मुळे गौतमी गोदावरी नावाने प्रसिद्ध झाली. गंगाद्वारातून निघून गोदावरी थोडी दूर जाऊन लुप्त होते आणि नंतर पर्वताखाली प्रकट होते. नदी पुन्हा लुप्त होऊ नये म्हणून गौतमांनी चारी दिशांना दुर्वा फेकून पाण्यास कुशावर्तातून वाहण्यास भाग पाडले. कुशावर्ताजवळ गंगासागर तलाव आहे. निवृत्तीनाथांची समाधी आणि गोरक्ष गुहा जवळच आहेत.
प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वराची पालखी गाजवाजात कुशावर्तावर नेली जाते आणि परत आणली जाते. इथेच अहिल्या नावाची छोटी नदी गोदावरीला मिळते, याचा संगमावर निपुत्रिक लोक संतान प्राप्तीसाठी पूजा करतात.
सिंहस्थ कुंभमेळा:
असे मानतात की समुद्र मंथनाच्या वेळेस जो अमृत कुंभ मिळाला त्यातले काही थेंब उज्जैन, हरिद्वार आणि प्रयाग क्षेत्रासोबत त्र्यंबकेश्वर येथे पडले होते. म्हणून प्रत्येक बारा वर्षांनी जेव्हा गुरु सिंह राशीत असतो तेव्हा त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा लागतो.

जवळच ४ किलोमीटर वर श्री स्वामी समर्थांचे दिंडोरी प्रणित गुरूपीठ आहे तेथे आवर्जून भेट द्यावी. तुम्हाला नक्की आवडेल. पुढच्या लेखात आपण गुरुपीठाची माहिती बघूया.

त्र्यंबकेश्वर येथे कसे जावे:
तुम्ही जर मुंबईहून येणार असाल तर कसारा घाटातून इगतपुरी मार्गे आणि कल्याण बायपास येथून भिवंडी-वाडा मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे.
रेल्वे ने जाणार असाल तर:
११.      सकाळची कसारा ट्रेन पकडून कसाऱ्याला जावे, बस किंवा जीप ने नाशिक बस डेपोला जाणे तेथून त्र्यंबकेश्वर बसेस लागतात.
२२.      पुणे मनमाड पसेंजर ट्रेन ने नाशिक रोड येथे जाणे आणि तेथून रिक्षा/बसची सुविधा आहे.

धन्यवाद.

निशांत पोतदार


Wednesday, August 7, 2013

भंडारदरा धरण




३.०८.२०१३ भंडारदरा धरण 

नमस्कार,
अनेक दिवसांपासून कुठे तरी बाहेर पावसाळी पिकनिक करायचे असा विचार चालू होता पण वेळ मिळत नव्हता.  आणि अचानक आमचे ठरले ते भंडारदरा येथे जायचे.  शुक्रवारी रात्री निलेश सोबत बोलून प्लान आखला. 
शनिवारी सकाळी कल्याण वरून ९. ३९ ची कसारा रेल्वे पकडून आम्ही दोघे निघालो.  निलेशने घोटी ला
येण्याचे सागितले तसे आम्ही कासारयाला उतरून ओमनी ने घोटीला उतरलो, पहिला टोलनाक्या पुढे निलेश आणि प्रियांका त्यांच्या कारच्या बाहेर आमची वाट पाहताच होते. लगेच आम्ही निघालो भंडारदर्याला. बर्याच दिवसांनी आम्ही भेटलो होतो. दोघांना भेटून खूप छान वाटले. 

घोटीचे वातावरण खुप छान आणि फ्रेश होते. त्यावरून अंदाज आलाच कि पुढे कसे असेल... काही वर्षांपूर्वी कळसुबाई ला गेलो होतो त्यानंतर आता त्या मार्गावरून चाललो होतो. जुन्या आठवणी सगळ्यांना सांगत आणि मज्जा करत आम्ही रस्ता कापत होतो. 


घोटीवरून जवळजवळ ४० किलोमीटरवर भंडारदरा धारण आहे.  पिकनिक स्पॉट धबधबा आणि अभयारण्य असे दोन स्पॉट तिथे आहेत. 
धरणावर आणि जवळच्या गार्डन मध्ये थोडे फोटो काढून आम्ही धरण दरवाज्याजवळ यायला निघालो तेव्हा मधेच एक आजोबा भेटले, त्यांनी सांगितलेल्या माहिती नुसार त्यांना इंदिरा गांधींच्या हस्ते पशुपक्षांचे आवाज काढण्यासाठी सुवर्ण पदक मिळाले होते. थोडी करमणुक म्हणून आही त्यांना आवाज काढायला लावले. त्यांचा विडीओ शुट करण्याचा मोह मला आवरला नाही. तुमच्यासोबत शेअर करत आहे. एकदा नक्की बघा.

भंडारदरा धारणाबद्दल मला मिळालेली माहिती अशी... 
भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९० ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३० ४’ ५”पूर्व.

भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.
भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. हा प्रदेश महर्षी अगस्ती आणि महर्षी वाल्मिकी अशा ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला असून जवळच अकोले येथे महर्षी अगस्ती यांचा आश्रम व आजोबाचा डोंगर येथे महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. प्रवरेच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव पृथ्वीवर अवतरले व त्यांनी गंगेचीच एक धारा असलेली प्रवरा नदी इथे प्रवाहित केली. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान असून म्हणून नदीला "अमृतवाहिनी" असे म्हटले जाते.

मुख्य आकर्षण
भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटनस्थळ असुन दरवर्षी विविध ठिकाणांहुन येथे भेट देणारांची संख्या वाढत आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांचे हे एक आवडते स्थान असुन कित्येक प्रसिद्ध हिंदी/मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच परिसरात झालेले आहे. (कटी पतंग, हीना, राम तेरी गंगा मैली, राजू चाचा, आणि देऊळ हे त्यांपैकी काही चित्रपट होत.)
कळसूबाई
भंडारदरा परिसरातच कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदीर आहे. नवरात्रात इथे दररोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. शिखरावरुन दिसणारे परिसराचे दृश्य अतिशय मनमोहक असे आहे.
अम्ब्रेला फॉल
विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला 'अम्ब्रेला फॉल' असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरु असताना खुप दुरवरुनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.
रंधा फॉल
शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजुन एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पुर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.
रतनवाडी
भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता आहे. रतनवाडी येथे अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंती मंदीर आहे. या मंदीरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असुन त्यात मुख्य गाभाऱ्यात एक् शिवलिंग आहे. पावसाळ्यात हे शिवलिंग पुर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परीसरात अनेक धबधबे असुन गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉल' हा विशेष लोकप्रिय आहे.
घाटघर
शेंडी येथुन पश्चिमेकडे २२किमीवर घाटघर हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असुन इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. इथे अनेक धबधबे असुन पावसाळ्यात हा संपुर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला खुप पाऊस पडतो म्हणुन यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हंटले जाते.

जसजसे धरण जवळ येत होते तसतसा आम्हा चौघांचा उत्साह वाढत चालला होता. धरणावर पाहिलेपासून आलेले निलेशचे मोठे भाऊ हेमंत जंबे आणि त्यांचे कुटुंब भेटले, ते सुद्धा त्यांची कार घेऊन आले होते. सर्वांसोबत बराच वेळ धबधब्याखाली धम्माल मस्ती केली आणि फोटो काढले नंतर सपाटून भूक लागली आणि जवळच मिळणारा भेळभत्ता आम्ही सर्वांनी मिळून खाल्ला. मधेच पाऊस पडत होता मधेच ऊन पडत होते, आणि त्यात हिरवीगार झाडी.... मधेच येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे निसर्ग खूप सुंदर दिसत होता, त्यातच सोसाट्याचा वारा सुटला होता.


धरणावरच गरम चहा आणि भजीची दुकाने आहेत. तेथे गरम गरम भजी आणि चहा घेतला आणि पुन्हा धरणाच्या  भिंतीवर जाउन फोटो काढले.धरण पूर्ण भरून ओसंडून वाहत होते.





संध्याकाळ झाली आणि परतायची झाली. जेवढा जमेल तेवढा निसर्ग डोळ्यात साठवून आम्ही सगळे नाशिकला निघालो.


भंडारदरा धरणावर कसे जायचे?
जर मुंबईहून जाणार असाल तर सकाळी लवकर कसारा ट्रेन पकडून कसारा स्टेशनच्या बाहेरच जीप आणि ओम्नी वाले उभे असतात त्यांना घोटी बस स्टोप सांगणे आणि तेथून बस अथवा कोणतेही वाहन करणे. स्वतःचे चारचाकी वाहन असेल तर उत्तम. धरणापासून काही अंतरावर हॉटेल्स असल्याने जेवणाची सोय होते.

माझा  ब्लोग कसा वाटला ते कॉमेंट्स मध्ये अथवा मेलने नक्की कळवा.

धन्यवाद ,
निशांत पोतदार 









Friday, July 19, 2013

कथा श्री विठ्ठल-रुक्मिणीची

नमस्कार,
असाच एक लेख इंटरनेटवर मिळाला, तो शेअर करत आहे. नक्की वाचा। 

मित्रांनो, काय असेल अर्थ भूवैकुंठाधिपतिचा ? काय असेल पंढरपूरचे वैशिष्ठ्य, जिथे लाखो लोक दर वर्षी पायी येतात, जी 'वारी' या नावाने प्रसिद्ध आहे?
पंढरपूर हे असे स्थान आहे, जिथे परमेश्वर स्वत: आपल्या पत्नीसमवेत सगुण रुपात आहेत!
इथे कळेल आपल्याला वारीचे कारण आणि वैशिष्ठ्य भूवैकुंठ पंढरपूरचे!

कथा श्री विठ्ठल-रुक्मिणीची

पूर्वी, ५व्या किंवा ६व्या शतकात, पुंडलिक नावाचा विष्णुभक्त होऊन गेला. तो, पत्नी व आई-वडिल मुक्ताबाई आणि जानुदेव यांच्या बरोबर दिंडीरवन नावाच्या जंगलात रहात होता. पुंडलिक हा सत्गुणी पुत्र होता, पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई-वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले. हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले, तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली. ती पतीसमवेत, घोड्यावर ते आई-वडिल ज्या समूहाबरोबर जात होते, तेथे पोहोचले. वाटेत ते एका आश्रमाजवळ पोहोचले, जो 'कुक्कुटस्वामीं'चा होता. तेथे त्या सर्वानी एक-दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला.

त्या रात्री सारे झोपी गेले, पण पुंडलिकाला झोप लागेना. पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातील काही तरुण स्त्रीया आश्रमात येताना दिसल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, पाणी आणून, स्वामिंचे कपडे धुतले. आणि त्या बाहेर आल्या व पुंडलिकाजवळून जाऊन त्या अदृश्य झाल्या. पुढील पहाटेही त्याला तेच दिसले. पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोण आहेत हे सांगण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या, की त्या गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे भाविक आपली पापे धुतात. त्यामुळेच होतात त्या अस्वच्छ. "आणि तू आई-वडिलांना वाईट वागणूक दिल्याने, महापापी आहेस." असे त्या म्हणाल्या.

यामुळे त्याच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व आज्ञार्थी पुत्र झाला, व तो त्यांचा आदर राखू लागला. तेव्हा त्याने आई-वडिलांना विनंती केली, की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडीरवनात यावे.

एके दिवशी, द्वारकाधिश श्रीकृष्ण (भगवान श्री विष्णु) एकटे असताना, त्यांना मथुरेतील दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोप-गोपिका आणि राधा. जरी ती मृत होती तरी, त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तींनी तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले. तेव्हाच रूक्मिणी कक्षात आली, आणि राधाने उभे न राहून त्यांचा निरादर केल्याने रूक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आली. नंतर भगवान श्री विष्णु तिच्या शोधार्थ प्रथम मथुरा नंतर गोकूळला गेले, गोपाळांना भेटले. मग त्यांनीही शोध सुरू केला. ते शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले.

शेवटी ते भीमा (किंवा चंद्रभागा) नदीतिराजवळ आले. सोबत असलेल्या गोपाळांना 'गोपाळपूर' येथे सोडून स्वतः दिंडीरवन जंगलात तिच्या शोधार्थ निघाले. आणि तिथे रूक्मिणी सापडल्यावर, तिचा राग शांत केला. नंतर रूक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात
आले.

पण तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहित झाले, की भगवान श्री विष्णु स्वतः भेटायला आले आहेत, तरी आई-वडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली, त्यावर उभे राहण्यासाठी. पुंडलिकाची आपल्या आई-वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णुने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे. आणि भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णु आहेत विठ्ठल या अवतारात!

विठ्ठल म्हणजे असा जो विटेवर उभा आहे. ( विठ्ठल - विट + ठल (उभा ठाकणे)