नमस्कार वाचकांनो...
काही कारणांमुळे ब्लॉग पोस्ट लिहायला उशीर झाला म्हणुन आता लिहीत आहे.
2018 चा पावसाळा नुकताच संपत आला होता आणि वातावरण फारच छान झाले होते म्हणुन एखादी राईड तर बनते असा विचार आम्ही ऑफिस मध्यला मित्रांनी केला आणि स्पॉट ठरवला माळशेज घाट.
पुन्हा थोडे डिस्कस करून ठरवले one day ride मारायची कल्याण> माळशेज घाट> गणेश खिंड> शिवनेरी> ओझर मार्गे पुन्हा कल्याण.
प्लॅनिंग झाले आणि दिवस ठरला.
रविवारी पहाटे 3 वाजल्यापासून आमचे एकमेकांना फोन सुरु झाले. नेमका शनिवारी मध्यरात्री धो धो पाऊस कोसळत होता आणि मनिष विरार वरून येणार होता. एक विचार मनात पण येऊन गेला की राईड पुढे ढकलावी, पण एकदा ठरवले म्हणजे ठरवले.
सकाळी 6 वाजता मी आणि अजय ने कल्याणच्या आधारवाडी चौकात चहाच्या टपरीवर भेटायचं ठरवलं होतं. मनिष विरारहून येईपर्यंत मस्त फक्कड चहा मारला. राईडचा मस्त मूड बनला होता.
काही वेळाने म्हणजे जवळ जवळ एक तासाने मनिष आधारवाडी चौकात आला. नेहेमी प्रमाणे थोडे फोटो सेशन करून, आम्ही निघालो. 😎📷
कल्याणच्या बिर्ला कॉलेजजवळच्या रोशन पेट्रोल पंप वर आम्ही दोघांनी बुलेटच्या टाक्या फुल केल्या.
आमचा पुढचा स्टॉप होता टोकावडे गावाजवळील हॉटेल प्रांजली. अजयने सुचवलेल्या या हॉटेल मध्ये मिसळ छान मिळते म्हणुन आम्ही पण इथेच नस्त्याला थांबण्याचा आग्रह धरला.
सरळ गावापासून पुढे वळणदार रोड लागतो, मला नेहमीचाच रस्ता असल्याने गाडी चालवताना बिलकुल अनपेक्षित झटके 😁 मिळाले नाहीत.
हॉटेल प्रांजली ला आम्ही मस्त मिसळ पाव आणि चहा मारला. फ्रेश होऊन पुढचा टप्पा लवकर पार करायचा होता म्हणून जास्त ठिकाणी ब्रेक न घेता आम्ही बाईक मारत होतो.
नाणेघाट खिंडी जवळ येताच इतिहासातल्या छत्रपतींच्या
काही घटना आठवल्या. त्याच आठवणी मनात ठेऊन पुढे वळणदार रस्त्यावरून आमचे घोडे पळवत होतो.
शेवटी माळशेज घाट सुरु झाला. बाजूने ट्रॅक्स जोरात जात असल्याने थोडे सावधपणे गाडी चालवत होतो.
पहिला स्पॉट लागला आणि आम्ही थांबून फोटो शेशन सुरु केले. निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊन आम्ही पुढच्या स्पॉट वर निघालो.
सकाळी जवळ जवळ 9.30 वाजता अपेक्षेपेक्षा लवकर आम्ही माळशेज घाटात एमटीडीसी रिसॉर्ट जवळ पोहोचलो होतो.
आता सर्व पॉइंट्स पाहून झाले होते म्हणुन शिवनेरी ला कोणत्या मार्गे जायचे ते ठरवून बाईकस् ला किक मारली.
छत्रपतींचे जन्मस्थळ शिवनेरीवर मी पहिल्यांदाच जाणार होतो म्हणून गडा विषयी फार उत्सुकता होती. अखेर गणेश खिंडीतून आम्ही शिवनेरीवर जायला निघालो.
जवळ जवळ दहा ते बारा किलोमीटर चा रस्ता खडबडीत होता,तसेच रोड गावा बाहेरून असल्याने एकही गॅरेज लागले नाही. जर तुम्ही सुद्धा यामार्गे शिवनेरी किल्ल्यावर जाणार असाल तर तुमची कार किंवा बाईक ठीक आहे ना याची खात्री करून घ्या.
अखेर आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. बुलेट्स किल्ल्याखाली पार्क करून किल्यावर जाण्याचा विचार केला पण वेळ कमी असल्याने खालूनच महाराष्ट्रातील मावळ्यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या त्या पावन झालेल्या गडाचे दर्शन घेऊन आणि महाराजांची माफी मागून आम्ही पुढच्या वाटेला लागलो.
ओझरचा गणपती:
ओझर शिवनेरी पासून खुप जवळ आहे. अष्टवनायकांपैकी ओझर हे गणपतीचे एक स्थान म्हणुन प्रसिद्ध ठिकाण आहे.
पितृपक्षात गेल्याने आम्हाला खूपच कमी गर्दी मिळाली. त्यामुळे गणपतीचे दर्शन एकदम निवांत आणि बराच वेळ घेता आले.
आम्ही तिघांनी दर्शन घेऊन थोडे फोटोज् घेतले. गरम झाल्याने मंदिराच्या सभामंडपात जरावेळ बसुन आराम केला. बराच वेळ मोबाईल ला नेटवर्क नव्हते, त्यामुळे मंदिरात बसुन पटापट घरच्यांना फोन करून आम्ही खुशाली कळवली.
गणपती बाप्पाला पुन्हा एकदा नमस्कार करून सर्वांचे कल्याण, सुखशांती चिंतून आम्ही निघालो.
दुपार झाली होती आणि भुक पण फार लागली होती. म्हणुन हायवे ला एका प्रसिद्ध धाब्यावर मस्त चिकन रस्सा आणि भातावर ताव मारला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
रस्ता फारच स्वच्छ आणि बिना खड्यांचा होता त्यामुळे गाडी राईड करताना फार मजा येत होती. दुपारी 3 वाजता आम्ही जुन्नर वरून निघालो. इतके प्रसन आणि ताजे वातावरण आपल्या मुंबईत क्वचितच पाहायला मिळते.
माळशेज घाट उतरून खाली आल्यावर मुरबाड जवळ एका हॉटेलमध्ये आम्ही चहा घेतला आणि पुन्हा कुठे राईड मारायची यावर विचार सुरू केला.
कल्याणच्या खडकपाड्यावर बरोबर संध्याकाळी सहा वाजता आम्ही पोहोचलो. मनिष ला पुढे विरार ला लवकरात लवकर पोहोचायचे होते म्हणुन त्याचा जास्त वेळ न घेता आम्ही त्याला जाऊ दिले. पुढे जवळजवळ 9.30 ला तो घरी पोहोचला.
शिवनेरीवर जायचे कसे?
कल्याण वरून जाणार असाल तर बिर्ला कॉलेज मार्गे, शहाड> मुरबाड>माळशेज मार्गे जावे.
खर्च किती आला?
प्रत्येकी अंदाजे ₹ 300-350/-
नोट:
राईडला जाताना शक्यतो riding (safety) jacket, gloves, knee guards and sunglasses असणे केव्हा हि योग्य आणि Helmet is MUST
|
निशांत |
|
अजय |
|
मनिष |
आजच्या व्ही-ब्लॉगच्या काळात सुद्धा माझा ब्लॉग वाचणाऱ्या समस्त वाचकांना धन्यवाद.
धन्यवाद!
निशांत पोतदार.