Translate this blog

banner

Tuesday, June 18, 2013

किल्ले कोहोज

किल्ले कोहोज

नमस्कार मित्रांनो,
आज आपण कोहोज गडाविषयीची माहिती बघुया…

काही जुने मित्र आणि काही नवीन मैत्रिणींसोबत :) ट्रेक करण्याचा योग आला. बरेच जण मुंबईहून येणार होते तर त्यातले काहीजण वेस्टर्नचे असल्यामुळे वसई मार्गे येणार होते.  कल्याणला आमचे भेटण्याचे ठरले त्याप्रमाणे मुंबईहून येणारे सर्वजण सकाळी ६-६. १५ च्या सुमारास जमले. सकाळी साडेसहाची वाडा  बस पकडून आम्ही निघालो.

आमचे कल्याण सोडले आणि चोहोकडे हिरवा निसर्ग दिसू लागला, माझ्या मामाची गावे दिसू लागल्यामुळे काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या.  आजी आजोबांना भेटण्यासाठी तरसलेले ते डोळे आता कोहोज किल्ल्याची प्रतीक्षा करत होते. ठरल्याप्रमाणे सर्व जन वाडा बस डेपो वर उतरून टमटम मध्ये बसून कोहोजच्या  दिशेने निघालो.

आणि दुरूनच ढगांच्या आड ३२०० फुट उंचीचा कोहोज किल्ला दिसला. वसई मार्गे येणारे मित्र अमित, गीता,मंदार (१),मंदार (२) भेटले तेवढ्यात लीनाचा फोन आला, थोडा उशीर होणार होता तिला म्हणून सर्व निघून गेले आणि मी पायथ्याशी थांबलो.

तासाभराने लीना आली, आम्ही सोबतच निघालो.
तशी चढण खूप होती, लॉजिक लाऊन झिगझॅग असे चढू लागलो. सरळ चढत असताना दम जास्त लागून त्रास होऊ शकतो.शेवटी एका ठिकाणी आमचे सर्व मित्र मंडळी भेटली. आणि त्यांसोबत पुढचा प्रवास सुरु केला.

किल्ला तसा भक्कम आणि उंच होता. पायथ्याशी रानडुक्कर असल्याची भीती असल्याने एकत्र राहणेच सोईचे होते. सतत २ तास चालून आम्ही किल्ल्यावर आलो. किल्ल्यावर येणाऱ्या  गार गार हवेने आमचा थकवा कुठच्या कुठे निघून गेला.

किल्ल्याबद्दल मला इंटरनेटवर मिळालेली माहिती अशी:
मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा 'कोहोज ' हा प्रमुख किल्ला. वाडापासून अवघ्या १० -११ किमी वर वसलेला आहे.

इतिहास

या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बर्यापपैकी जुना, भोजकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट - बुरूज चढवले. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला. शेवटी तो इंग्रजांकडे गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

  • माचीवरचे विस्तीर्ण पठार वाटेने येताना अजिबात न जोखता आल्याने आश्चर्यचकित व्हायला होते.
  • माचीवर समोरच शंकराचे जिर्णोद्धारीत मंदिर आहे. त्याच्या समोरच दोन टाकी आहेत, पण ती खराब झालेली आहेत.
  • मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला थोडे खाली उतरून गेल्यावर एकमेकांना लागून खोदलेली सात टाकी आहेत.
यापैकी एका टाक्याचे पाणी अतिशय सुंदर आहे. दोन टाकी खराब झाली असून बाकी बुजलेली आहेत.मंदिराच्या उजवीकडे काही उद्ध्वस्त अवशेष आढळतात.
  • काही ठिकाणी जुजबी तटबंदी शिल्लक आहे. मंदिर डाव्या हाताला ठेवून पुढे गेले की उजवीकडे वर
जाणारी वाट दिसते. इथून वर चढताना उजव्या बाजूला पाण्याची ३ प्रशस्त टाकी लागतात. यापैकी १ बुजलेले असून बाकी पाणी शेवाळयुक्त असले तरी पिण्यायोग्य आहे. इथेच कोपर्याीत मारुतीची एक उघडी मूर्ती आहे. इथून तीच वाट घेऊन पुढे निघालं की आपण पडक्या बुरुजाजवळ येतो. डावीकडे छोटे मारुती मंदिर आहे. पायऱ्यां नी वर गडमाथ्यावर जायचं. इतकी चाल सुमारे १५ मिनिटांत आटोपते.
  • माथ्यावर वार्या ने तयार झालेले सुळके आहेत. यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा ही
निसर्गाची केवळ अवर्णनीय कलाकृती. ही कोहोजवरची सर्वात प्रेक्षणीय गोष्ट. विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो.
  • इथून थोडे पुढे डोळ्यांना सुखावणारे कृष्णाचे छोटे देऊळ आहे. वरून खालचा (वाडा - मनोर)
रस्ता छान दिसतो. या सगळयात एक गोष्ट मात्र मनाला खंतावून जाते, मिळेल त्या ठिकाणी मंदिरांवर, प्रस्तरांवर, इतकेच काय पण पुतळ्यावरही लोकांनी आपली नावे बदनाम करून ठेवलेली आहेत.
गडावर निवारा असा नाही. शंकराच्या मंदिरात केवळ २ माणसे राहू शकतात.खाण्याची सोय आपणच करावी, पिण्याचे पाणी गडावर आहे. बारमाही पाण्याची सोय आहे.

कोहोज किल्ल्यावर कसे जायचे:

कल्याण, ठाणे,येथून जर जाणार असाल तर बस ने वाडा येथे उतरून डेपो जवळूनच ६ सिटर मिळतात.
नवी मुंबई हून येणार असाल तर कल्याण किंवा ठाण्याला उतरून बस ने जावे. वेस्टर्न ने येणार असाल तर पालघर मार्गे येऊ शकता.

सोबत दुपारचे जेवण ठेवावे अन्यथा गैरसोय होईल.
औषधे  जवळ ठेवावीत. एक प्लास्टिक पिशवी असणे केव्हाही चांगले. आपले सुकेकपडे त्यात ठेवण्यास उपयोगी पडेल.

आपल्यासाठी काही फोटो शेअर करत आहे.

धन्यवाद..
आपल्यास हा ब्लोग आवडल्यास नक्की कॉमेंट्स देणे.

आपला प्रवास सुखाचा होवो.

निशांत पोतदार


No comments:

Post a Comment