Translate this blog

banner

Sunday, June 9, 2013

पावसाळी ट्रेक साठी अत्यंत उपयोगी माहिती


खालील पोस्ट माझा खास मित्र श्री. विशाल पेडणेकर यांच्याकडून घेतली आहे.  पावसाळी ट्रेक साठी अत्यंत उपयोगी अशी माहिती आहे. ट्रेकर्स मंडळींनी नक्की वाचून ट्रेक करवेत.

वीकएण्ड जवळ आला की अनेक भटकी मंडळी ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात. पावसाळ्यात तर असे असंख्य ट्रेक्स आयोजित केले जातात. पावसाळ्यातल्या ट्रेकिंगची मजा काही औरच असते. पुण्या-मुंबईकडची अशी अनेक भटकी मंडळी जवळपासच्या एखाद्या ठिकाणी एक दिवसाच्या ट्रेकसाठी जातात. यातले कित्येक जण अशा ट्रेक्सना प्रथमच आलेले असतात.


मान्सून ट्रेकवर जाताना काय खबरदारी घ्यावी,??


पावसाळ्यात ट्रेकर्सचे काही हमखास स्पॉट्स म्हणजे राजमाची, लोहगड, पेठ, पेब-माथेरान, नाणेघाट, हरिश्चंदगड, भीमाशंकर हे गड-किल्ले. पावसाळ्यातल्या शनिवार-रविवारी सरासरी २०० जण एखाद्या ठिकाणी असतात. लोहगडावर तर ही संख्या हजाराचा आकडा गाठते.


१) नेहमीच्याच स्पॉट्सना भेटी देण्याऐवजी नव्या गडकिल्ल्यांना भेटी देण्याचा प्रयत्न ट्रेकर्सनी करावा. एकटे जाण्यापेक्षा संस्थांमार्फत जाणं कधीही उत्तम. त्यामुळे मुलं-मुली जबाबदारीने ट्रेकिंग करतील आणि प्रत्येकाची वर्तणूकही जबाबदारीपूर्ण राहील. पालकांनीही ही काळजी घ्यावी.


२) पावसाचा आनंद लुटा, पण जिवाची सुरक्षितता महत्त्वाची.
३) मद्यपान पूर्णत: र्वज्य करावे. मद्यपानामुळे तोल तर सुटतोच शिवाय डिहायड्रेशन किंवा थंडी भरण्यासारखा त्रासही होऊ शकतो.
४) पुरेसे पाणी प्या.
५) नायलॉन, पॉलिप्रॉपिलीनसारखे सिंथेटिक मटेरिअल किंवा टेरिकॉटचे लवकर वाळणारे कपडे वापरावेत. सुती कपडे नकोत.
६) बोटे उघडी राहतील अशा चपला किंवा स्लिप-ऑन शूज वापरू नका. रबर सोल असलेले नाडीवाले बूट वापरा.
७) पावसाळ्याच्या रेनकोटबरोबरच विण्डचिटर वापरणेही चांगले. खूप वारा असल्यास त्याचा चांगला वापर होतो.
८) वेगळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुक्या कपड्यांचे दोन स्वतंत्र जोड ठेवावेत. ट्रेक संपल्यावर आवर्जून सुके कपडेच घालावेत.


९) रस्त्याबद्दल अचूक माहिती नसेल तर जवळपासच्या गावातून वाटाड्या सोबत घ्यावा.
१०) निसरड्या वाटेवरून चालताना खूप काळजी घ्यावी. विशेषत: कड्यावरून थेट उतार असलेल्या वाटांवर धोका संभवतो.
११) ओढे ओलांडताना पाण्याची खोली, जमिनीचा उतार, पाण्याचा जोर आणि पावसाचा जोर यांचा अंदाज घ्यावा.
१२) डोंगराच्या वरच्या भागात जोराचा पाऊस सुरू झाल्यास अचानक ओढ्यातल्या पाण्याचा जोर वाढू शकतो. तेव्हा इतर परिसरातल्या पावसाचाही अंदाज घेत राहा.
१३) वेगवान ओढे न ओलांडता प्रतीक्षा करणं केव्हाही उत्तम.


१४) ग्रुपमधल्या किमान एका सदस्याने तरी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेतलेले असावे.
१५) ट्रेकरूटच्या प्लॅनची माहिती घरच्या मंडळींनाही असावी. त्यामुळे संपर्क साधणे सोपे जाईल.
१६) छोट्या ट्रेकमध्येही एक किंवा दोन बॅटऱ्या तसेच स्वेटरही जवळ ठेवावा. उशीर झाल्यास कामी येऊ शकेल.
१७) वाट चुकलात तर एखाद्या सुरक्षित स्थळी थांबून राहणे केव्हाही योग्य. इतर जण तुम्हाला शोधू शकतील.
१८) नैसगिर्क आपत्तीबद्दल ग्रामस्थांच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्यावे. त्यांना त्याचे अचूक ज्ञान असते.
१९) आणि सगळ्यात महत्वाचे निसर्गाची काळजी घ्या.


आलेल्या पावसाळ्यातील तुमचे सगळे ट्रेक सुरक्षित, सुखरूप आणि धम्माल होवोत... !!

No comments:

Post a Comment