Translate this blog

banner

Tuesday, June 18, 2013

सापुतारा, गुजरात


मध्ये नाशिकला गेलो होतो निलेश आणि प्रियांकाला भेटायला. तेव्हा आम्ही अचानक सापुतारा येथे जाण्याचे ठरवले. तसे प्लान करून निलेश प्रियांका, मी आणि शिल्पा आम्ही निलेशच्या कार ने निघालो. सापुतारा काय आहे मला बिलकुल माहिती  नव्हती म्हणून पूर्णपणे निलेश वरच अवलंबून होतो. जसजसे नाशिक सोडून गुजरात येऊ लागले तेव्हा समजले काहीतरी चांगले पाहायला मिळणार आहे आणि तसेच झाले. निलेश ने आम्हाला खूश केले कारण ठिकाणाच तसे होते.

नाशिकवरून सापुतार्याला यायला जवळ जवळ ३ तास लागले. भरपूर पर्यटक आले होते सापुतारा फिरण्यासाठी त्यात काही बाहेरच्या देशातून आलेले होते.
सापुतारा हे स्थळ
भारताच्या गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील एक पर्यटनस्थळ आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या शहरापासुन सुमारे ८० कि.मी. अंतरावर आहे. यासाठी राज्य मार्ग क्र.१७ (डिंडोरी रस्ता)ने राज्य मार्ग क्र. २३ पर्यंत जाउन मग त्या मार्गाने सापुताऱ्यापर्यंत जाता येते. हे ठिकाण गुजरात राज्याच्या वनसदा राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे.या ठिकाणी हवा थंड राहते.मुंबई अथवा अमदावाद येथुन रेल्वेने बिलिमोरीया या स्थानकापर्यंत जाउन तेथुन बस अथवा टॅक्सीने तेथे जाता येते.गुजरात-महाराष्ट्र सीमा येथून सुमारे ५ कि.मी.अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटर उंचीवर असलेले हे स्थान सातपुडा पर्वतराजीवर एका पठारासारख्या ठिकाणी वसलेले आहे.

उन्हाळ्यात येथे २७ ते ३१ सेल्सियस येवढे तापमान राहते.हिवाळ्यात ते ९ ते २० सेल्सियस या दरम्यान राहु शकते.

बरीच ठिकाणे पाहून आम्ही शेवटी रोपवे ने सनसेट पाहण्यास गेलो. फोटो काढून परतीच्या प्रवासास लागलो.

पाहण्यासारखी ठिकाणे


गीरा धबधबा
  • हथगढ किल्ला
  • कलाकारांचे खेडे(आर्टीस्टस् व्हिलेज)
  • मध संकलन केंद्र
  • गीरा धबधबा
  • रोप-वे
  • बोटींग क्लब
  • म्युझियम (संग्रहालय)
  • सनराइज पॉईंट
  • सनसेट पॉईंट
  • इको पॉईंट
  • अ‍ॅकॅरियम   
  •  पोहचण्याचा मार्ग
  • जवळील विमानतळ- सुरत- १७२ किमी.
  • जवळील रेल्वेस्टेशन- बिलीमोरा- १७२ किमी
  • नाशिक या शहरापासुन सुमारे ८० कि.मी.
  • मुंबई या शहरापासुन सुमारे १८५ कि.मी.
  • सुरत या शहरापासुन सुमारे १७२ कि.मी.

इच्छादेवी मंदिर, मध्यप्रदेश


नमस्कार...
आज घेऊन येत आहे इच्छापूर देवस्थान, मध्यप्रदेश.

नवीनच लग्न झाले होते म्हणून सासरच्या गावाला बोलावणे आले होते.  त्याच वेळी जोडीने इच्छादेवीच्या दर्शनाला  जाण्याचा योग आला. सकाळीच मेहुण्याची बाईक काढून आम्ही दोघे निघालो. मंदिर बद्दल खूप एकूण होतो आणि आज त्याच मंदिरास भेटण्याचा दुर्मिळ योग आला म्हणून मनात फुलपाखरे भिरभिरत होती.
पातोंडी गावापासून सुमारे १३ किलोमीटर वर इच्छादेवी मंदिराचे स्थान आहे, म्हणजेच महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर.

मंदिरचा परिसर सुंदर आणि स्वच्छ आहे, ह्या मंदिराबद्दल ऐकलेली कथा अशी:...
४५० वर्षांपूर्वी एका मराठा सुभेदाराने पुत्रेछा पूर्ण झाल्यामुळे ह्या डोंगरावर देवीचे मंदिर बांधले होते.
त्यानंतर काही वर्षांनी, मंदिरापर्यंत जाण्यासाठी भुस्कुटे परिवाराने पायऱ्या बांधून घेतल्या.

इथे दरवर्षी चैत्रात २ दिवसांची  यात्रा भरते जिथे खूप दुरून हजारोंच्या संखेत भाविक दर्शनाला येतात.सध्या इच्छापूर ग्राम पंचायत जत्रेची पूर्ण व्यवस्था पाहते. देवीची मूर्ती अति प्राचीन आहे. देवी भाविकांची इच्छा पूर्ण करणारी असल्यामुळे अनेक भक्त येथे दर्शनास आणि केलेला नवस फेडण्यास दरवर्षी येतात. भाविक आणि देणगीदारांच्या मदतीने आज मंदिर भव्य बनले आहे. जवळच श्री मारुती, दत्तगुरू आणि भगवान शंकराचे मंदिर आहे. तसेच ट्रस्टचा लग्नाचा हॉल असल्यामुळे अनेक भाविक आपल्या मुले आणि मुलींचे लग्न लावण्यास येत असतात.

इच्छापुरास कसे जावे::
मुंबईहून जायचे असल्यास, कुर्ला-पटना (राजेंद्रनगर) ने रावेर ला उतरून बस ने जाणे. (बस ची frequency खूप कमी आहे.)
मध्यप्रदेश मधून येत असाल किंवा खंडवा, बऱ्हाणपूर वरून मंदिर जवळ जवळ २३ किलोमीटर वर आहे.
इच्छादेवी तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करो असे मागणे देविकडे मागून आपला निरोप घेतो.

धन्यवाद.
निशांत पोतदार

किल्ले कोहोज

किल्ले कोहोज

नमस्कार मित्रांनो,
आज आपण कोहोज गडाविषयीची माहिती बघुया…

काही जुने मित्र आणि काही नवीन मैत्रिणींसोबत :) ट्रेक करण्याचा योग आला. बरेच जण मुंबईहून येणार होते तर त्यातले काहीजण वेस्टर्नचे असल्यामुळे वसई मार्गे येणार होते.  कल्याणला आमचे भेटण्याचे ठरले त्याप्रमाणे मुंबईहून येणारे सर्वजण सकाळी ६-६. १५ च्या सुमारास जमले. सकाळी साडेसहाची वाडा  बस पकडून आम्ही निघालो.

आमचे कल्याण सोडले आणि चोहोकडे हिरवा निसर्ग दिसू लागला, माझ्या मामाची गावे दिसू लागल्यामुळे काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या.  आजी आजोबांना भेटण्यासाठी तरसलेले ते डोळे आता कोहोज किल्ल्याची प्रतीक्षा करत होते. ठरल्याप्रमाणे सर्व जन वाडा बस डेपो वर उतरून टमटम मध्ये बसून कोहोजच्या  दिशेने निघालो.

आणि दुरूनच ढगांच्या आड ३२०० फुट उंचीचा कोहोज किल्ला दिसला. वसई मार्गे येणारे मित्र अमित, गीता,मंदार (१),मंदार (२) भेटले तेवढ्यात लीनाचा फोन आला, थोडा उशीर होणार होता तिला म्हणून सर्व निघून गेले आणि मी पायथ्याशी थांबलो.

तासाभराने लीना आली, आम्ही सोबतच निघालो.
तशी चढण खूप होती, लॉजिक लाऊन झिगझॅग असे चढू लागलो. सरळ चढत असताना दम जास्त लागून त्रास होऊ शकतो.शेवटी एका ठिकाणी आमचे सर्व मित्र मंडळी भेटली. आणि त्यांसोबत पुढचा प्रवास सुरु केला.

किल्ला तसा भक्कम आणि उंच होता. पायथ्याशी रानडुक्कर असल्याची भीती असल्याने एकत्र राहणेच सोईचे होते. सतत २ तास चालून आम्ही किल्ल्यावर आलो. किल्ल्यावर येणाऱ्या  गार गार हवेने आमचा थकवा कुठच्या कुठे निघून गेला.

किल्ल्याबद्दल मला इंटरनेटवर मिळालेली माहिती अशी:
मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा 'कोहोज ' हा प्रमुख किल्ला. वाडापासून अवघ्या १० -११ किमी वर वसलेला आहे.

इतिहास

या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बर्यापपैकी जुना, भोजकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट - बुरूज चढवले. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला. शेवटी तो इंग्रजांकडे गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

  • माचीवरचे विस्तीर्ण पठार वाटेने येताना अजिबात न जोखता आल्याने आश्चर्यचकित व्हायला होते.
  • माचीवर समोरच शंकराचे जिर्णोद्धारीत मंदिर आहे. त्याच्या समोरच दोन टाकी आहेत, पण ती खराब झालेली आहेत.
  • मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला थोडे खाली उतरून गेल्यावर एकमेकांना लागून खोदलेली सात टाकी आहेत.
यापैकी एका टाक्याचे पाणी अतिशय सुंदर आहे. दोन टाकी खराब झाली असून बाकी बुजलेली आहेत.मंदिराच्या उजवीकडे काही उद्ध्वस्त अवशेष आढळतात.
  • काही ठिकाणी जुजबी तटबंदी शिल्लक आहे. मंदिर डाव्या हाताला ठेवून पुढे गेले की उजवीकडे वर
जाणारी वाट दिसते. इथून वर चढताना उजव्या बाजूला पाण्याची ३ प्रशस्त टाकी लागतात. यापैकी १ बुजलेले असून बाकी पाणी शेवाळयुक्त असले तरी पिण्यायोग्य आहे. इथेच कोपर्याीत मारुतीची एक उघडी मूर्ती आहे. इथून तीच वाट घेऊन पुढे निघालं की आपण पडक्या बुरुजाजवळ येतो. डावीकडे छोटे मारुती मंदिर आहे. पायऱ्यां नी वर गडमाथ्यावर जायचं. इतकी चाल सुमारे १५ मिनिटांत आटोपते.
  • माथ्यावर वार्या ने तयार झालेले सुळके आहेत. यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा ही
निसर्गाची केवळ अवर्णनीय कलाकृती. ही कोहोजवरची सर्वात प्रेक्षणीय गोष्ट. विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो.
  • इथून थोडे पुढे डोळ्यांना सुखावणारे कृष्णाचे छोटे देऊळ आहे. वरून खालचा (वाडा - मनोर)
रस्ता छान दिसतो. या सगळयात एक गोष्ट मात्र मनाला खंतावून जाते, मिळेल त्या ठिकाणी मंदिरांवर, प्रस्तरांवर, इतकेच काय पण पुतळ्यावरही लोकांनी आपली नावे बदनाम करून ठेवलेली आहेत.
गडावर निवारा असा नाही. शंकराच्या मंदिरात केवळ २ माणसे राहू शकतात.खाण्याची सोय आपणच करावी, पिण्याचे पाणी गडावर आहे. बारमाही पाण्याची सोय आहे.

कोहोज किल्ल्यावर कसे जायचे:

कल्याण, ठाणे,येथून जर जाणार असाल तर बस ने वाडा येथे उतरून डेपो जवळूनच ६ सिटर मिळतात.
नवी मुंबई हून येणार असाल तर कल्याण किंवा ठाण्याला उतरून बस ने जावे. वेस्टर्न ने येणार असाल तर पालघर मार्गे येऊ शकता.

सोबत दुपारचे जेवण ठेवावे अन्यथा गैरसोय होईल.
औषधे  जवळ ठेवावीत. एक प्लास्टिक पिशवी असणे केव्हाही चांगले. आपले सुकेकपडे त्यात ठेवण्यास उपयोगी पडेल.

आपल्यासाठी काही फोटो शेअर करत आहे.

धन्यवाद..
आपल्यास हा ब्लोग आवडल्यास नक्की कॉमेंट्स देणे.

आपला प्रवास सुखाचा होवो.

निशांत पोतदार


Sunday, June 9, 2013

पावसाळी ट्रेक साठी अत्यंत उपयोगी माहिती


खालील पोस्ट माझा खास मित्र श्री. विशाल पेडणेकर यांच्याकडून घेतली आहे.  पावसाळी ट्रेक साठी अत्यंत उपयोगी अशी माहिती आहे. ट्रेकर्स मंडळींनी नक्की वाचून ट्रेक करवेत.

वीकएण्ड जवळ आला की अनेक भटकी मंडळी ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात. पावसाळ्यात तर असे असंख्य ट्रेक्स आयोजित केले जातात. पावसाळ्यातल्या ट्रेकिंगची मजा काही औरच असते. पुण्या-मुंबईकडची अशी अनेक भटकी मंडळी जवळपासच्या एखाद्या ठिकाणी एक दिवसाच्या ट्रेकसाठी जातात. यातले कित्येक जण अशा ट्रेक्सना प्रथमच आलेले असतात.


मान्सून ट्रेकवर जाताना काय खबरदारी घ्यावी,??


पावसाळ्यात ट्रेकर्सचे काही हमखास स्पॉट्स म्हणजे राजमाची, लोहगड, पेठ, पेब-माथेरान, नाणेघाट, हरिश्चंदगड, भीमाशंकर हे गड-किल्ले. पावसाळ्यातल्या शनिवार-रविवारी सरासरी २०० जण एखाद्या ठिकाणी असतात. लोहगडावर तर ही संख्या हजाराचा आकडा गाठते.


१) नेहमीच्याच स्पॉट्सना भेटी देण्याऐवजी नव्या गडकिल्ल्यांना भेटी देण्याचा प्रयत्न ट्रेकर्सनी करावा. एकटे जाण्यापेक्षा संस्थांमार्फत जाणं कधीही उत्तम. त्यामुळे मुलं-मुली जबाबदारीने ट्रेकिंग करतील आणि प्रत्येकाची वर्तणूकही जबाबदारीपूर्ण राहील. पालकांनीही ही काळजी घ्यावी.


२) पावसाचा आनंद लुटा, पण जिवाची सुरक्षितता महत्त्वाची.
३) मद्यपान पूर्णत: र्वज्य करावे. मद्यपानामुळे तोल तर सुटतोच शिवाय डिहायड्रेशन किंवा थंडी भरण्यासारखा त्रासही होऊ शकतो.
४) पुरेसे पाणी प्या.
५) नायलॉन, पॉलिप्रॉपिलीनसारखे सिंथेटिक मटेरिअल किंवा टेरिकॉटचे लवकर वाळणारे कपडे वापरावेत. सुती कपडे नकोत.
६) बोटे उघडी राहतील अशा चपला किंवा स्लिप-ऑन शूज वापरू नका. रबर सोल असलेले नाडीवाले बूट वापरा.
७) पावसाळ्याच्या रेनकोटबरोबरच विण्डचिटर वापरणेही चांगले. खूप वारा असल्यास त्याचा चांगला वापर होतो.
८) वेगळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुक्या कपड्यांचे दोन स्वतंत्र जोड ठेवावेत. ट्रेक संपल्यावर आवर्जून सुके कपडेच घालावेत.


९) रस्त्याबद्दल अचूक माहिती नसेल तर जवळपासच्या गावातून वाटाड्या सोबत घ्यावा.
१०) निसरड्या वाटेवरून चालताना खूप काळजी घ्यावी. विशेषत: कड्यावरून थेट उतार असलेल्या वाटांवर धोका संभवतो.
११) ओढे ओलांडताना पाण्याची खोली, जमिनीचा उतार, पाण्याचा जोर आणि पावसाचा जोर यांचा अंदाज घ्यावा.
१२) डोंगराच्या वरच्या भागात जोराचा पाऊस सुरू झाल्यास अचानक ओढ्यातल्या पाण्याचा जोर वाढू शकतो. तेव्हा इतर परिसरातल्या पावसाचाही अंदाज घेत राहा.
१३) वेगवान ओढे न ओलांडता प्रतीक्षा करणं केव्हाही उत्तम.


१४) ग्रुपमधल्या किमान एका सदस्याने तरी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेतलेले असावे.
१५) ट्रेकरूटच्या प्लॅनची माहिती घरच्या मंडळींनाही असावी. त्यामुळे संपर्क साधणे सोपे जाईल.
१६) छोट्या ट्रेकमध्येही एक किंवा दोन बॅटऱ्या तसेच स्वेटरही जवळ ठेवावा. उशीर झाल्यास कामी येऊ शकेल.
१७) वाट चुकलात तर एखाद्या सुरक्षित स्थळी थांबून राहणे केव्हाही योग्य. इतर जण तुम्हाला शोधू शकतील.
१८) नैसगिर्क आपत्तीबद्दल ग्रामस्थांच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्यावे. त्यांना त्याचे अचूक ज्ञान असते.
१९) आणि सगळ्यात महत्वाचे निसर्गाची काळजी घ्या.


आलेल्या पावसाळ्यातील तुमचे सगळे ट्रेक सुरक्षित, सुखरूप आणि धम्माल होवोत... !!

पाउलवाटाच्या सर्व वाचकांना पहिल्या पाउसाच्या खूप खूप शुभेच्छा


पाउलवाटाच्या सर्व वाचकांना पहिल्या पाउसाच्या खूप खूप शुभेच्छा…

निशांत पोतदार
(पाउलवाटा)

Tuesday, June 4, 2013

नमस्कार



नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

तुम्ही विचार करत असाल, बरेच महिने झाले आपल्या पाऊलवाटा ब्लॉग वर नवीन माहिती आली नाही आहे.  खरे म्हटले तर ऑफिसच्या कामात व्यस्त असल्यामुळे जास्त कुठे फिरणे झालेच नाही.

या पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार चालू आहे तर लवकरच  काहीतरी छान तुम्हाला वाचण्यासाठी घेऊन येइन.  तरी आपल्या पाऊलवाटा ब्लॉगला भेट देत रहा.

धन्यवाद,

निशांत पोतदार
(admin)
पाऊलवाटा 
nishantpotdar@gmail.com
BBM:29F1DE99




Monday, April 8, 2013

आपले नवीन फेसबूक पेज

 आपले  नवीन फेसबूक पेज MyClikography आणि पाऊलवाटा आवडले तर नक्की लाईक करा. 

नवीन ब्लॉग MyClikography 

धन्यवाद,

निशांत पोतदार 

Admin 

Thursday, January 24, 2013

नवश्या गणपती, नाशिक


 ६ जानेवारी २०१३
नवश्या गणपती, नाशिक

जवळच्या नातेवाइकाच्या लग्नाच्या निमित्ताने मला नाशिकला जायचा योग आला, सोबत बायको होती,म्हटले चला जाऊया गणपतीच्या दर्शनाला. माझा मित्र निलेश त्याची पत्नी प्रियांका आणि आम्ही दोघे असे कार्यक्रम आटपून दर्शनाला निघालो.
इंदिरा नगर नंतर अंबड सोडून पुढे नाशिक MIDC आतल्या रस्त्याने आम्ही नवश्या गणपतीच्या दर्शनाला आलो. रात्री पारा बराच खाली उतरला होता जवळ जवळ १० degree होता आणि रात्रीचे ९ वाजले होते.
मंदिराजवळ खूप शांतता होती बाहेरच गाडी उभी करून आम्ही दर्शनाला निघालो. नवश्या गणपतीचे नाव खूप ऐकले होते पण जाण्याचा योग काही येत नव्हता  तो आज आला तो पण जोडीने.
मंदिरा बद्दल जी माहिती मिळाली ती अशी.. आणि थोडी फार माहिती इंटरनेट वरून मिळाली.

पेशवे कालीन ऐतीहासिक नवश्या गणपती मंदिर हे आनंदवल्ली येथील अत्यंत जागृत असे देवस्थान आहे. नवश्या गणपती हा नवसाला पावतो असा अनुभव हजारो भाविकांना आलेला आहे. ह्या मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे.

इ.स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी ह्या मंदिराची स्थापना केली होती. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवल्ली हे गाव आजोळ होते व त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई ह्या देखिल नवश्या गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या.

राघोबा दादा व आनंदीबाई ह्यांना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झला व त्याचे नाव विनायक असे ठेवण्यात आले. ह्या मुलाच्या जन्मप्रित्यर्थ चावंडस गावाचे नाव बदलून आनंदवल्ली असे ठेवण्यात आले. ह्याच दरम्यान नवश्या गणपतीच्या मंदिराची उभारणी सुरु झाली. गोदावरीच्या तीरी पुर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेशाची मुर्ती आहे.

मुर्तीचे डोळे अतीशय सजीव असून मुर्ती आकर्षक आहे. ह्या गणेशाला चार हात असून त्यात पाश, मोदक, फूल आहे व चौथा हात आशीर्वाद दर्शविणारा आहे. प्रत्येक हातात कडे आहे. मूळ मुर्तीच्या डोक्यावर मुकूट आहे.

राघोबा दादांनी आनंदवल्ली येथे राजवाडाही बांधला होता, राजवाड्यात पश्विमेस उभे राहिल्यावर श्री नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडवली व राजवाडा जाळून टाकला. मात्र परीसरातील मंदिरे शाबूत राहिली. श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या करकिर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे.
मंदिराचा पत्ता: श्री नवश्या गणपती मंदीर,  गंगापूर रोड, आनंदवल्ली, नाशिक

असे म्हणतात कि आपला नवस बाप्पाच्या कृपेने पूर्ण झाल्यास मंदिरात घण्टा  बांधतात. अश्या अनेक घंटा मंदिरात आपल्याला दिसतात. मंदिराचे काढलेले काही फोटो आपल्यासोबत शेअर करत आहे.




नवश्या गणपती 
 प्रत्येकाने नक्की भेट द्या मंदिराला. बाप्पाच्या कृपेने माझ्या सर्व वाचकांनासुद्धा मंदिरात घंटा बांधण्याचा योग यावा अशी नम्र प्रार्थना करून आपला निरोप घेतो.
धन्यवाद...

निशांत पोतदार





Monday, August 20, 2012

नमस्कार मित्रांनो...
काल नाशिकला गेलो होतो, येताना कसारा घाटात काढलेले काही फोटो आपल्यासोबत शेअर करत आहे. खूप सुंदर असा निसर्ग आपल्याला तेथे अनुभवाला मिळतो.
खालील फोटो सेव करण्यासाठी फोटोवर क्लीक करून फोटो फुल स्क्रीन करा, त्यावर राईट क्लिक करून save image  as वर क्लीक करा.



माझे अपडेट्स कसे वाटतात ते नक्की सांगा. माझा मेल आयडी nishantpotdar@gmail.com / paulwata@gmail.com / BBM: 25F1DE99 अन्यथा  खाली  कमेंट्स करा.
धन्यवाद..
निशांत पोतदार
(पाऊलवाटा)

Thursday, August 2, 2012

किल्ले माहुली, शहापुर

किल्ले माहुली, शहापुर 

15 जुलै 2012

किल्ले माहुली 
पुन्हा एकदा चार वर्षानंतर किल्ले माहुलीला जाण्याचा योग घडवून आणला.
2815 फुट उंच असा ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंचीचा  हा  किल्ला ट्रेकिंगसाठी आवडीचे ठिकाण मानले जाते. इतिहासात या किल्ल्याचा उल्हेख आढळतो. छत्रपती शिवरायांचे वडिल  श्रीमंत शहाजी राजे भोसले यांच्या ताब्यात हा गड होता.

किल्ल्याचा इतिहास:
ह्या किल्ल्याचे निर्माते मुगल आहेत. 1485 मध्ये हा किल्ला निजामशाहीत आला. जेव्हा शहाजी राजे निजामशाहीचे सचिव बनले तेव्हा दिल्लीच्या मुगलांनी निजामशाहीचा अंत करण्याचा प्रयत्न केला। 1635-36 मध्ये, खुद्द शहाजी राजे जीजाबाई आणि शिवाजी सोबत माहुलीला स्थानांतरित झाले.जेव्हा जमान खान ने किल्ल्यावर हमला केला,शहाजी राजांनी मदतीसाठी पोर्तुगीजांना विचारले. पोर्तुगीजांच्या मदतीत नकार दिला आणि शहाजी महाराजांनी आत्मसमर्पण केले.
8 जानेवारी 1658 साली, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुगलांकडून किल्ला हस्तगत केला. 1661 मध्ये परत करून पुन्हा महाराजांनी किल्ला जिंकला. 1665 साली झालेल्या पुरंदरच्या तहात, मराठ्यांनी हा किल्ला परत गमावला. फेब्रुवारी 1670 मध्ये, शिवाजी महाराजांनी माहुली जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न असफल झाला। मनोहरदास गौड हे त्यावेळेस किल्ल्याचे गडकरी म्हणू काम सांभाळत होते. एक हजार मराठे त्या लढाईत धारतीर्थ पडले.त्यातले बरेचजण माहुलीच्या जवळपासच्या खेडे गावांतील होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत सरदार कदम यांस सांगितले होते कि ते आमचे सोन आहेत म्हणून महाराजांनी त्यांच्या कुटुंबाला सोनारे हे उपनाव दिले.

 16 जून 1670रोजी,  दोन महिन्यांनतर मोरोपंत पिंगळे यांनी किल्ल्यावर विजय मिळवला. आणि माहुली, भंडारगड आणि पळसगड स्वराज्यात आणले.1817 पर्यंत हा किल्ला शिवाजी महाराजांच्या देखरेखी खाली होता पण त्या नंतर त्यावर ब्रिटिशांनी आपला वचक बसवला.

कसे पोहोचायचे :
मुंबई-नाशिक हायवे वर आसनगाव नावाचे एक गाव आहे (मुंबई ते आसनगाव अंदाजे 91 किमी ) आसनगाव जवळच मानस मंदिरम आहे तिथून आत जाणे. अंदाजे 3 किमी आत किल्ल्याचा पायथा आहे.
जर तुम्ही रेल्वे ने जाणार असाल तर मध्यरेल्वेचे आसनगाव स्टेशनवर उतरून आसनगाव पश्चिम वरून रिक्षा किंवा मारुती ओम्नी गाडी मिळते (अंदाजे रु 50 माणशी ) ते थेट गडाच्या पायथ्याशी नेऊन सोडतात.
 निसर्गाची मज्जा लुटत जर तुम्ही चालत जाणार असाल तर स्टेशनवरून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचायला अंदाजे 2-अडीच तास लागतात.
खालीच शिव शंकराचे मंदिर लागते, जवळच छोटा ढाबा आहे,तिथे जेवणाची सोय होते. सोबत स्वतः चे जेवण घेऊन गेलात तर उत्तम, अन्यथा नास्ता हाऊस मध्ये जेवणाची सोय होईलच.





मी सकाळी मध्यरेल्वेच्या आसनगाव ट्रेनने जायला निघालो. कल्याणला मुंबईहून आलेला नवीन मित्र राजेश भेटला।त्याला सोबत घेऊन मी आसनगाव ला पोहोचलो. कसारा ट्रेन ने विशाल, माधव आणि मकरंद यायला निघाले, त्यांना सोबत घेऊन स्टेशनच्या बाहेरील ढाब्यावर मस्त गरम गरम वडा उसळ आणि कडक चहा पित असतानाच मस्त पाउस आला, बाहेर पडणारा पाउस एन्जोय करत आम्ही नास्ता  केला.

मारुती ओम्नी मधून आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. अप्रतिम वातावरणात फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरणार नाही?? तसा आम्हाला सुधा आवरता आला नाही. फोटो सेशन करत आम्ही दुसऱ्य  ग्रुपसोबत जायचे ठरवले कारण किल्ल्यावर जाताना अनेक भुलवणाऱ्या पाउलवाटा आहेत. आम्ही कुठेही मार्ग चुकू नये याची खबरदारी घेत होतो.
हिरवे गार वातावरण बघून शाळेत शिकवलेली कविता आठवली..

हिरवे हिरवे गाल गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमलीवरती,
ती वनराणी खेळत होती|| '  अहाहा..

रान हळद 
किल्ल्यावर चढताना अनेक ठिकाणी सरळ चढण, निसरड्या वाटा लागल्या. जस जसे वर जात होतो तस तसे एक हुरूप अंगात संचारत होता, छत्रपती शिवरायांना स्मरून आमची चढण चालूच होती, बरेच अंतर पार केल्यावर एक शिडी लागली, शिडी तशी लोखंडाची होती पण आता वजन वाढल्यामुळे थोडी भीती वाटतच होती..  :) :P  पण मनाशी ठरवलेच होते काहीही झाले तरी किल्ला सर करायचाच!
किल्ल्यावर चढतानाच अचानक थांबलेला पाउस पुन्हा सुरु झाला आणि जो जोश आला तो किल्ल्यावर जाईपर्यंत टिकून होता.किल्ल्यावर जंगली वनस्पती आणि रानटी  झाडी खूप आहे. तसेच वन्यप्राणी सुद्धा आहेत.
 रस्त्यातच आम्हाला रानहळदि चे रोपटे लागले. फोटो काढून आम्ही किल्ल्यावर आलो. खूप भूक लागली होती, बरोबर जे काही आणले होते ते सर्वांनी वाटून खाल्ले आणि आराम केला. अंगातला शीण उतरला आणि आम्ही पुढे उरलेला किल्ला पाहण्यास निघालो.

किल्ल्यावरच  शिव शंकराची पिंड आहे आणि छोटा पाण्याचा टाक पण. तिथूनच थोडे खाली उतरले असता एक दरवाजा लागतो. बहुतेक मुख्य दरवाजा तोच असावा. दरवाज्यातच बाजूला दगडात कोरलेले सिंह आहेत, तसेच बाजूला लेणी आहेत.

खास सांगायचे म्हणजे एक रूल  लक्षात ठेवा जेव्हा माहुलीला जाल... Always keep left.
अनेक वाटा आपला मार्ग चुकाविणाऱ्या  आहेत. पाऊलवाटे वरून जाताना दुर्गप्रेमींनी बाणाच्या खुणा बनवल्या आहेत त्यांना  फोलो  करा..
आणखी काही खास गोष्टी नमूद करत आहे: (माझा खास मित्र विशाल याने सांगितलेल्या )
1) गडावर भरपूर डास  आहेत..म्हणून सोबत ओडोमोस घेऊन चला, डास  चावल्यास फार मोठे पुरळ उठतात.
2) जर धावपळीत ओडोमोस घेऊन जायला विसारालातच तर जंगलातील ओळी माती हातापायांना लाऊन चला।, डास  चावणार नाहीत.
3)गड चडताना मध्यावर थोडी सरळ चढण आहे.. जीन्स किंवा  अंग्सारशी कपडे घालु  नये.काही ठिकाणी चढण एका पायाच्या उंची पेक्षा जास्त आहे।
4)सोबत भरपूर पाणी घेऊन जा.गडावरचे पाण्याचे टाके गढूळ बनले आहे.
आणखी सर्वात महत्वाची गोष्ट.... गडावर कोठेही  आपले किंवा संघाचे नाव कोरु नका. ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लाऊन स्वराज्य मिळवले आणि टिकवले, त्यांनी  स्वतः चे नाव कुठेही लिहिले नाही तर आपण कोण?

ट्रेक ला येणारा अंदाजे खर्च रुपये 250 प्रत्येकी (मध्यम रेल्वे )
आपल्यासाठी रेल्वेचे वेळापत्रक देत आहे:
Asangaon Slow timetable

CST 6.10 am
Dadar 6.28 am
Kurla 6.39 am
Thane 7.05 am
Dombivli 7.27 am
Kalyan 7.36 am
Asangaon 8.14


Kasara slow time table

@ CST 5.03 am
dadar 5.21 am
Kurla 5.32 am
Thane 5.58 am
Kopar 6.17 am
Dombivli 6.20 am
Kalyan 6.28 am
Asangaon 7.05 am
 

आपला प्रवास सुखाचा होवो.
।।छत्रपती शिवाजी महाराज की जय।।
धन्य ती जिजाऊ । धन्य  ते शिवबा।।
धन्यवाद 
 आपला मित्र 
निशांत पोतदार 
(BBM :29F1DE99)



सर्व फोटोंसाठी या संकेत स्थळाला भेट द्या: http://alturl.com/xpyak  किंवा खालील बारकोड मोबाईल कोड स्कॅनरने  क्लीक  करा: