Translate this blog

banner

Monday, June 24, 2013

मान्सून पिकनिक स्पॉट



पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. रिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे.
कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरचं जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू झालीये.

- भिवपुरी - माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ हॉटेल्स आहेत. गावकर्यांना सांगितल्यास ते जेवणाची सोय करतात.

- चिंचोटी - इथे पोहोचताना हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या मार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतील.मुख्य धबधब्याजवळ पोहचायला सुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर कामनजंक्शनजवळ हे ठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जावे लागते.

- तुंगारेश्वर - नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो.
मुंबईपासून सुमारे तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी डोंगरावर कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही.

- रांधा फॉल - सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा धबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरीजवळ असलेल्या विल्सन डॅमजवळ हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय नसली तरी इगतपुरीजवळ जेवणाची व्यवस्था होते.

- पांडवकडा - खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा गेल्या दहा वर्षांंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या लीस्टमध्ये अग्रभागी आहे. या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असली तरी अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट देतात. आजूबाजूच्या डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.

- झेनिथ - खोपोली शहरापासून किमीवर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या पाण्याचा फोर्स खूप आहे, पण तरीही तरुणाईला पिकनिकसाठी झेनिथला जाण्याचा मोह काही आवरत नाही.म्हणूनच शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होत असते. इथल्या प्रत्येक कोपर्यावर पंजाबी धाबे आहेत.

- पळसदरी - मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे.
रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते.
जेवणाची सोय या ठिकाणी होते.

- गाढेश्वर - पनवेल तालुक्यात पावसाळी गर्दी गाढेश्वर नदीकाठी पाहायला मिळते. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून येतात.

- फणसाड धबधबा - फणसाड अभयारण्यामधील या धबधब्यात चिंब होणं म्हणजे एक रोमहर्षक अनुभव आहे. या धबधब्यात सचैल स्नानानंतर अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची हिरवाई पाहण्यात एक वेगळा आनंद आहे.

- सवतकडा - मुरुड-जंजिरापासून ११ किमी अंतरावरील सवतकडा धबधबा पर्यटकांनी शोधून काढला आहे. मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील शिघ्रे गावातून सवतकड्याची पाऊलवाट जाते. या पाऊलवाटेवरून जाण्याचा थरार अविस्मरणीय आहे. जवळपास खाण्याची सोय नाही.

- गवळीदेव - नवी मुंबईतील घणसोली गावाजवळ असणारा गवळीदेव धबधबाही आसपासच्या पर्यटकांना खुणावत आहे. शहराच्या इतक्या जवळ असूनही हा धबधबा आणि गवळीदेव डोंगर अनेक मूलभूत सोयीसुविधांपासूून वंचित आहे.

- कोंडेश्वर - बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे. इथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोह असून त्यात कपार्या असल्याने येथे पाण्यात उतरताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.

- भगीरथ - वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही.

- टपालवाडी - नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्या आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ यथेच्छ पोहण्यासाठी छान डोह असणारा एक धबधबा आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांपैकीच कुणीतरी टपालवाडीचा धबधबाअसे त्याचे नाव ठेवले आहे. ठिकाण अतिशय निसर्गरम्य असले तरी येथे जेवण तसेच कोणतेही खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था नाही.

- आषाणे - भिवपुरी-कर्जतदरम्यान भिवपुरीपासून पाच किमीवर असणार्या आषाणे गावाजवळील धबधबा हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी भिवपुरीपासून रिक्षा मिळते. आषाणे ग्रामस्थ पर्यटकांना मागणीनुसार जेवण करून देतात.

- थिदबीचा धबधबा - पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. कल्याण-माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावापासून पुढे थिदबी गावापर्यंत कि.मी.
कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल.

- निवळी - निवळी घाट चढताना पर्यटकांना आकर्षित करतो तो हिरव्या दाट झाडीतून कोसळणारा धबधबा. निवळी धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी घाटातच पर्यटकांसाठी खास पॉइंट तयार करण्यात आला आहे. ज्या पर्यटकांना प्रत्यक्ष धबधब्याजवळ जायचे असेल त्यांच्यासाठी पायर्यांचा मार्ग तयार करण्यात आला आहे.

- मोहिली धबधबा - कर्जतपासून ते किमीवर उल्हास नदी पार करून मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई असे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं, असे वाटते. धबधब्याजवळ थंड वातावरणात गरम गरम वाफाळता चहा आणि मक्याची कणसे खाण्याची मजाच काही औरच आहे.
लोणावळ्याचे भुशी धरण,त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी पावसाळ्यात बरेच पर्यटक जातात. इथून जवळच असलेला कोरीगड, तैलबैला,घनगड, कैलासगड इत्यादीसारख्या किल्ल्यांना पावसाळ्यात भेट देण म्हणजे काही औरच मजा आहे. लोणावळ्याजवळील कार्ला-भाजे लेण्या, लोहगड,विसापूर, राजमाची, तुंग,तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो. हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल दर्याचा देखावा एक अविस्मरणीय आनंद देतो.

- माळशेजघाटाआधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे. याच्यामागे असणारी भीमाशंकरची डोंगररांग पावसाळ्यात विलोभनीय दिसते आणि त्याचबरोबर आपण गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड इत्यादी एक दिवसाचे ट्रेकसुद्धा करू शकतो.

- ठाणे जिल्ह्यातील जव्हार म्हणजे डोंगरदर्या, असंख्य धबधबे, दूरवर पसरलेली भातशेती, यांनी नटलेले छोटेसे हिल स्टेशन. इथला हनुमान टेकडी, शिर्पा माळ, दाभोसा धबधबा ठिकाण पाहण्यासारखा आहे. कसारा घाटाअलीकडे बळवंतगड हा छोटासा किल्लादेखील पाहण्यासारखा आहे.

- नाशिक त्र्यंबकेेशर परिसरात असणारे कावनई, गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादीसारख्या बर्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते.

- ठाणे-नाशिक महामार्गावर आटगावहून तानसा आणि याच भातसा धारणाकडे जाणारा रस्ता आहे. इथेदेखील एक दिवसीय पावसाळी सहलीला जाता येईल. कळसुबाई, भंडारदरा आणि रंध धबधब्याला पावसाळ्यात भेट द्या. इथले अमृतेेशर मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. साम्रात गावाजवळील सांधण दरी अप्रतिम आहे. रतनगड किल्लादेखील याच परिसरात असून अनेक मंडळी रतनगड ते हरिश्चंद्रगड असा ट्रेकदेखील करतात.

- धुळे-नंदुरबार इथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच आहे.इथले जंगल, डोंगर, दर्या, पक्षी, रंगीबेरंगी फुले आपले मन प्रसन्न करून टाकतील यात वादच नाही.

- नाशिकच्या पुढेच असणार्या चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील जंगल हे पावसाळ्यात पर्यटनाचे आणखी काही पर्याय ठरू शकतात. इथे असलेला कण्हेरगड किल्ला आणि केदारेेश्वर धबधबा पाहण्यासारखा आहे.

- चिखलदरा हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासीयांचे आवडते ठिकाण. इथे असणारा गाविलगड किल्ला, किचकदरा यासारखी बरीच ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.चिखलदर्याहून जवळच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला नक्की भेट द्या.

- सातारा जिल्ह्यातलं कासचे पठार म्हणजे महाराष्ट्रातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. साधारण सप्टेंबर महिन्यात या पठारावर असंख्य विविधरंगी फुले फुलतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक इथे भेट देतात. कासबरोबरच सातार्याजवळ नदीकिनारी आणि जुन्या मंदिरांचा समूह असणार्या माहुली तसेच अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा पाहण्यासारखा आहे.
सातारहून कि.मी. असणार्या कण्हेर धरणाला सुद्धा भेट देता येईल.

- ट्रेकर्सनी पन्हाळगड ते विशाळगड हा पावसाळी ट्रेक नक्की करावा. मसाईचे विस्तीर्ण पठार, शेती, जंगल, ओढे, नदी, नाले, छोटी छोटी गावे अशा ठिकाणांहून हा ट्रेक पूर्ण होतो.

- पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणार्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटा लगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येईल. डोंगरातून वाहणारे छोटे मोठे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारं छोटंसं गाव, आणि त्या गावालगत वाहणारी नदी असे वेड लावणारं सौंदर्य वरंधाघाटात आहे. वरंधा घाट उतरल्यावर शिवथरघळ इथली गुहा आणि त्या गुहेबाहेर पडणारा पाऊस, धबधबा म्हणजे क्या बात!

- रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळील सुकेळी खिंडीजवळ खांबगाव नजीक सुरगड किल्ल्याला देखील भेट देणं छान वाटेल. मुंबईहून महाडकडे जाताना याच सुकेळी खिंडीपासून पायवाटेने साधारण २० मिनिटांनंतर एक उंच धबधबा दिसतो. त्या धबधब्याचं पाणी आणि नदी हे एक अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे.

- रायगड जिल्ह्यात खोपोली पाली रस्त्यालगत दुरशेत गावाआधी उंबरखिंड हे स्थान आहे. खंडाळ्याच्या डोंगरातून पडणारे पाणी उंबरखिंडीत येते आणि नदीमार्गे कोकणात जाते.दुरशेतहून पुढे जांभूळपाड्यामार्गे भेलीव गावालगतचा मृगगड हा किल्ला आणि त्याकडे जाणारा नदीलगतचा मार्गही पर्यटकांना भुरळ पाडतो. गणपतीच्या पाली गावाआधी ठाणाळे हा लेणी समूह आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात आपले विलोभनीय रूप दाखवतो. पाली गावालगतच सरसगड हा किल्ला आहे, आणि तेथून पुढे असणारा सुधागड किल्ल्याला देखील पावसाळ्यात भेट देणं मस्तच.
चला तर मग,,, बघु आपली वाट यातल्या कोणत्या गावाकडे जाते ते...

Saturday, June 22, 2013

तीळसा शिव मंदिर ,वाडा


तीळसा शिव मंदिर हे प्राचीन मंदिर वाडा शहरापासून जवळ जवळ किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराचे खास वैशिष्ठ म्हणजे दर वर्षी महाशिवरात्रीला या मंदिरा बाजूला वाहणाऱ्या नदीत देवमासे दिसतात. आणि खास म्हणजे इतर दिवशी हे मासे दिसत नाहीत. असे म्हणतात कि या माश्यांपैकी एका माश्याच्या नाकात नथ आहे आणि तो मासा फक्त महाशिवरात्रीला पहाटेच दिसतो, ज्याने हा मासा पहिला तो भाग्यवान अशी तेथील भाविकांची भावना आहे. आणि मी स्वतः इतर दिवशी जाऊन मासे पहिले, तर मला एक हि मासा पाण्यात दिसला नाही. वाचकांसाठी खास महाशिवरात्रीचे फोटो, आणि माश्यांचे फोटो  देत आहे.
जमल्यास या ठिकाणी नक्की भेट द्या.

तीळश्याला असे जायचे:
वाडा डेपोला उतरून बस किंवा आसनी रिक्षा.
जवळ जेवण ठेवणे. खेडेगाव असल्यामुळे तेथे चांगल्याप्रतीचे जेवण मिळत नाही तसेच पिण्याचे पाणी जवळ ठेवणे.

धन्यवाद,
निशांत पोतदार






Tuesday, June 18, 2013

सापुतारा, गुजरात


मध्ये नाशिकला गेलो होतो निलेश आणि प्रियांकाला भेटायला. तेव्हा आम्ही अचानक सापुतारा येथे जाण्याचे ठरवले. तसे प्लान करून निलेश प्रियांका, मी आणि शिल्पा आम्ही निलेशच्या कार ने निघालो. सापुतारा काय आहे मला बिलकुल माहिती  नव्हती म्हणून पूर्णपणे निलेश वरच अवलंबून होतो. जसजसे नाशिक सोडून गुजरात येऊ लागले तेव्हा समजले काहीतरी चांगले पाहायला मिळणार आहे आणि तसेच झाले. निलेश ने आम्हाला खूश केले कारण ठिकाणाच तसे होते.

नाशिकवरून सापुतार्याला यायला जवळ जवळ ३ तास लागले. भरपूर पर्यटक आले होते सापुतारा फिरण्यासाठी त्यात काही बाहेरच्या देशातून आलेले होते.
सापुतारा हे स्थळ
भारताच्या गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील एक पर्यटनस्थळ आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या शहरापासुन सुमारे ८० कि.मी. अंतरावर आहे. यासाठी राज्य मार्ग क्र.१७ (डिंडोरी रस्ता)ने राज्य मार्ग क्र. २३ पर्यंत जाउन मग त्या मार्गाने सापुताऱ्यापर्यंत जाता येते. हे ठिकाण गुजरात राज्याच्या वनसदा राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे.या ठिकाणी हवा थंड राहते.मुंबई अथवा अमदावाद येथुन रेल्वेने बिलिमोरीया या स्थानकापर्यंत जाउन तेथुन बस अथवा टॅक्सीने तेथे जाता येते.गुजरात-महाराष्ट्र सीमा येथून सुमारे ५ कि.मी.अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटर उंचीवर असलेले हे स्थान सातपुडा पर्वतराजीवर एका पठारासारख्या ठिकाणी वसलेले आहे.

उन्हाळ्यात येथे २७ ते ३१ सेल्सियस येवढे तापमान राहते.हिवाळ्यात ते ९ ते २० सेल्सियस या दरम्यान राहु शकते.

बरीच ठिकाणे पाहून आम्ही शेवटी रोपवे ने सनसेट पाहण्यास गेलो. फोटो काढून परतीच्या प्रवासास लागलो.

पाहण्यासारखी ठिकाणे


गीरा धबधबा
  • हथगढ किल्ला
  • कलाकारांचे खेडे(आर्टीस्टस् व्हिलेज)
  • मध संकलन केंद्र
  • गीरा धबधबा
  • रोप-वे
  • बोटींग क्लब
  • म्युझियम (संग्रहालय)
  • सनराइज पॉईंट
  • सनसेट पॉईंट
  • इको पॉईंट
  • अ‍ॅकॅरियम   
  •  पोहचण्याचा मार्ग
  • जवळील विमानतळ- सुरत- १७२ किमी.
  • जवळील रेल्वेस्टेशन- बिलीमोरा- १७२ किमी
  • नाशिक या शहरापासुन सुमारे ८० कि.मी.
  • मुंबई या शहरापासुन सुमारे १८५ कि.मी.
  • सुरत या शहरापासुन सुमारे १७२ कि.मी.

इच्छादेवी मंदिर, मध्यप्रदेश


नमस्कार...
आज घेऊन येत आहे इच्छापूर देवस्थान, मध्यप्रदेश.

नवीनच लग्न झाले होते म्हणून सासरच्या गावाला बोलावणे आले होते.  त्याच वेळी जोडीने इच्छादेवीच्या दर्शनाला  जाण्याचा योग आला. सकाळीच मेहुण्याची बाईक काढून आम्ही दोघे निघालो. मंदिर बद्दल खूप एकूण होतो आणि आज त्याच मंदिरास भेटण्याचा दुर्मिळ योग आला म्हणून मनात फुलपाखरे भिरभिरत होती.
पातोंडी गावापासून सुमारे १३ किलोमीटर वर इच्छादेवी मंदिराचे स्थान आहे, म्हणजेच महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर.

मंदिरचा परिसर सुंदर आणि स्वच्छ आहे, ह्या मंदिराबद्दल ऐकलेली कथा अशी:...
४५० वर्षांपूर्वी एका मराठा सुभेदाराने पुत्रेछा पूर्ण झाल्यामुळे ह्या डोंगरावर देवीचे मंदिर बांधले होते.
त्यानंतर काही वर्षांनी, मंदिरापर्यंत जाण्यासाठी भुस्कुटे परिवाराने पायऱ्या बांधून घेतल्या.

इथे दरवर्षी चैत्रात २ दिवसांची  यात्रा भरते जिथे खूप दुरून हजारोंच्या संखेत भाविक दर्शनाला येतात.सध्या इच्छापूर ग्राम पंचायत जत्रेची पूर्ण व्यवस्था पाहते. देवीची मूर्ती अति प्राचीन आहे. देवी भाविकांची इच्छा पूर्ण करणारी असल्यामुळे अनेक भक्त येथे दर्शनास आणि केलेला नवस फेडण्यास दरवर्षी येतात. भाविक आणि देणगीदारांच्या मदतीने आज मंदिर भव्य बनले आहे. जवळच श्री मारुती, दत्तगुरू आणि भगवान शंकराचे मंदिर आहे. तसेच ट्रस्टचा लग्नाचा हॉल असल्यामुळे अनेक भाविक आपल्या मुले आणि मुलींचे लग्न लावण्यास येत असतात.

इच्छापुरास कसे जावे::
मुंबईहून जायचे असल्यास, कुर्ला-पटना (राजेंद्रनगर) ने रावेर ला उतरून बस ने जाणे. (बस ची frequency खूप कमी आहे.)
मध्यप्रदेश मधून येत असाल किंवा खंडवा, बऱ्हाणपूर वरून मंदिर जवळ जवळ २३ किलोमीटर वर आहे.
इच्छादेवी तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करो असे मागणे देविकडे मागून आपला निरोप घेतो.

धन्यवाद.
निशांत पोतदार

किल्ले कोहोज

किल्ले कोहोज

नमस्कार मित्रांनो,
आज आपण कोहोज गडाविषयीची माहिती बघुया…

काही जुने मित्र आणि काही नवीन मैत्रिणींसोबत :) ट्रेक करण्याचा योग आला. बरेच जण मुंबईहून येणार होते तर त्यातले काहीजण वेस्टर्नचे असल्यामुळे वसई मार्गे येणार होते.  कल्याणला आमचे भेटण्याचे ठरले त्याप्रमाणे मुंबईहून येणारे सर्वजण सकाळी ६-६. १५ च्या सुमारास जमले. सकाळी साडेसहाची वाडा  बस पकडून आम्ही निघालो.

आमचे कल्याण सोडले आणि चोहोकडे हिरवा निसर्ग दिसू लागला, माझ्या मामाची गावे दिसू लागल्यामुळे काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या.  आजी आजोबांना भेटण्यासाठी तरसलेले ते डोळे आता कोहोज किल्ल्याची प्रतीक्षा करत होते. ठरल्याप्रमाणे सर्व जन वाडा बस डेपो वर उतरून टमटम मध्ये बसून कोहोजच्या  दिशेने निघालो.

आणि दुरूनच ढगांच्या आड ३२०० फुट उंचीचा कोहोज किल्ला दिसला. वसई मार्गे येणारे मित्र अमित, गीता,मंदार (१),मंदार (२) भेटले तेवढ्यात लीनाचा फोन आला, थोडा उशीर होणार होता तिला म्हणून सर्व निघून गेले आणि मी पायथ्याशी थांबलो.

तासाभराने लीना आली, आम्ही सोबतच निघालो.
तशी चढण खूप होती, लॉजिक लाऊन झिगझॅग असे चढू लागलो. सरळ चढत असताना दम जास्त लागून त्रास होऊ शकतो.शेवटी एका ठिकाणी आमचे सर्व मित्र मंडळी भेटली. आणि त्यांसोबत पुढचा प्रवास सुरु केला.

किल्ला तसा भक्कम आणि उंच होता. पायथ्याशी रानडुक्कर असल्याची भीती असल्याने एकत्र राहणेच सोईचे होते. सतत २ तास चालून आम्ही किल्ल्यावर आलो. किल्ल्यावर येणाऱ्या  गार गार हवेने आमचा थकवा कुठच्या कुठे निघून गेला.

किल्ल्याबद्दल मला इंटरनेटवर मिळालेली माहिती अशी:
मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा 'कोहोज ' हा प्रमुख किल्ला. वाडापासून अवघ्या १० -११ किमी वर वसलेला आहे.

इतिहास

या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बर्यापपैकी जुना, भोजकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट - बुरूज चढवले. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला. शेवटी तो इंग्रजांकडे गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

  • माचीवरचे विस्तीर्ण पठार वाटेने येताना अजिबात न जोखता आल्याने आश्चर्यचकित व्हायला होते.
  • माचीवर समोरच शंकराचे जिर्णोद्धारीत मंदिर आहे. त्याच्या समोरच दोन टाकी आहेत, पण ती खराब झालेली आहेत.
  • मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला थोडे खाली उतरून गेल्यावर एकमेकांना लागून खोदलेली सात टाकी आहेत.
यापैकी एका टाक्याचे पाणी अतिशय सुंदर आहे. दोन टाकी खराब झाली असून बाकी बुजलेली आहेत.मंदिराच्या उजवीकडे काही उद्ध्वस्त अवशेष आढळतात.
  • काही ठिकाणी जुजबी तटबंदी शिल्लक आहे. मंदिर डाव्या हाताला ठेवून पुढे गेले की उजवीकडे वर
जाणारी वाट दिसते. इथून वर चढताना उजव्या बाजूला पाण्याची ३ प्रशस्त टाकी लागतात. यापैकी १ बुजलेले असून बाकी पाणी शेवाळयुक्त असले तरी पिण्यायोग्य आहे. इथेच कोपर्याीत मारुतीची एक उघडी मूर्ती आहे. इथून तीच वाट घेऊन पुढे निघालं की आपण पडक्या बुरुजाजवळ येतो. डावीकडे छोटे मारुती मंदिर आहे. पायऱ्यां नी वर गडमाथ्यावर जायचं. इतकी चाल सुमारे १५ मिनिटांत आटोपते.
  • माथ्यावर वार्या ने तयार झालेले सुळके आहेत. यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा ही
निसर्गाची केवळ अवर्णनीय कलाकृती. ही कोहोजवरची सर्वात प्रेक्षणीय गोष्ट. विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो.
  • इथून थोडे पुढे डोळ्यांना सुखावणारे कृष्णाचे छोटे देऊळ आहे. वरून खालचा (वाडा - मनोर)
रस्ता छान दिसतो. या सगळयात एक गोष्ट मात्र मनाला खंतावून जाते, मिळेल त्या ठिकाणी मंदिरांवर, प्रस्तरांवर, इतकेच काय पण पुतळ्यावरही लोकांनी आपली नावे बदनाम करून ठेवलेली आहेत.
गडावर निवारा असा नाही. शंकराच्या मंदिरात केवळ २ माणसे राहू शकतात.खाण्याची सोय आपणच करावी, पिण्याचे पाणी गडावर आहे. बारमाही पाण्याची सोय आहे.

कोहोज किल्ल्यावर कसे जायचे:

कल्याण, ठाणे,येथून जर जाणार असाल तर बस ने वाडा येथे उतरून डेपो जवळूनच ६ सिटर मिळतात.
नवी मुंबई हून येणार असाल तर कल्याण किंवा ठाण्याला उतरून बस ने जावे. वेस्टर्न ने येणार असाल तर पालघर मार्गे येऊ शकता.

सोबत दुपारचे जेवण ठेवावे अन्यथा गैरसोय होईल.
औषधे  जवळ ठेवावीत. एक प्लास्टिक पिशवी असणे केव्हाही चांगले. आपले सुकेकपडे त्यात ठेवण्यास उपयोगी पडेल.

आपल्यासाठी काही फोटो शेअर करत आहे.

धन्यवाद..
आपल्यास हा ब्लोग आवडल्यास नक्की कॉमेंट्स देणे.

आपला प्रवास सुखाचा होवो.

निशांत पोतदार


Sunday, June 9, 2013

पावसाळी ट्रेक साठी अत्यंत उपयोगी माहिती


खालील पोस्ट माझा खास मित्र श्री. विशाल पेडणेकर यांच्याकडून घेतली आहे.  पावसाळी ट्रेक साठी अत्यंत उपयोगी अशी माहिती आहे. ट्रेकर्स मंडळींनी नक्की वाचून ट्रेक करवेत.

वीकएण्ड जवळ आला की अनेक भटकी मंडळी ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात. पावसाळ्यात तर असे असंख्य ट्रेक्स आयोजित केले जातात. पावसाळ्यातल्या ट्रेकिंगची मजा काही औरच असते. पुण्या-मुंबईकडची अशी अनेक भटकी मंडळी जवळपासच्या एखाद्या ठिकाणी एक दिवसाच्या ट्रेकसाठी जातात. यातले कित्येक जण अशा ट्रेक्सना प्रथमच आलेले असतात.


मान्सून ट्रेकवर जाताना काय खबरदारी घ्यावी,??


पावसाळ्यात ट्रेकर्सचे काही हमखास स्पॉट्स म्हणजे राजमाची, लोहगड, पेठ, पेब-माथेरान, नाणेघाट, हरिश्चंदगड, भीमाशंकर हे गड-किल्ले. पावसाळ्यातल्या शनिवार-रविवारी सरासरी २०० जण एखाद्या ठिकाणी असतात. लोहगडावर तर ही संख्या हजाराचा आकडा गाठते.


१) नेहमीच्याच स्पॉट्सना भेटी देण्याऐवजी नव्या गडकिल्ल्यांना भेटी देण्याचा प्रयत्न ट्रेकर्सनी करावा. एकटे जाण्यापेक्षा संस्थांमार्फत जाणं कधीही उत्तम. त्यामुळे मुलं-मुली जबाबदारीने ट्रेकिंग करतील आणि प्रत्येकाची वर्तणूकही जबाबदारीपूर्ण राहील. पालकांनीही ही काळजी घ्यावी.


२) पावसाचा आनंद लुटा, पण जिवाची सुरक्षितता महत्त्वाची.
३) मद्यपान पूर्णत: र्वज्य करावे. मद्यपानामुळे तोल तर सुटतोच शिवाय डिहायड्रेशन किंवा थंडी भरण्यासारखा त्रासही होऊ शकतो.
४) पुरेसे पाणी प्या.
५) नायलॉन, पॉलिप्रॉपिलीनसारखे सिंथेटिक मटेरिअल किंवा टेरिकॉटचे लवकर वाळणारे कपडे वापरावेत. सुती कपडे नकोत.
६) बोटे उघडी राहतील अशा चपला किंवा स्लिप-ऑन शूज वापरू नका. रबर सोल असलेले नाडीवाले बूट वापरा.
७) पावसाळ्याच्या रेनकोटबरोबरच विण्डचिटर वापरणेही चांगले. खूप वारा असल्यास त्याचा चांगला वापर होतो.
८) वेगळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुक्या कपड्यांचे दोन स्वतंत्र जोड ठेवावेत. ट्रेक संपल्यावर आवर्जून सुके कपडेच घालावेत.


९) रस्त्याबद्दल अचूक माहिती नसेल तर जवळपासच्या गावातून वाटाड्या सोबत घ्यावा.
१०) निसरड्या वाटेवरून चालताना खूप काळजी घ्यावी. विशेषत: कड्यावरून थेट उतार असलेल्या वाटांवर धोका संभवतो.
११) ओढे ओलांडताना पाण्याची खोली, जमिनीचा उतार, पाण्याचा जोर आणि पावसाचा जोर यांचा अंदाज घ्यावा.
१२) डोंगराच्या वरच्या भागात जोराचा पाऊस सुरू झाल्यास अचानक ओढ्यातल्या पाण्याचा जोर वाढू शकतो. तेव्हा इतर परिसरातल्या पावसाचाही अंदाज घेत राहा.
१३) वेगवान ओढे न ओलांडता प्रतीक्षा करणं केव्हाही उत्तम.


१४) ग्रुपमधल्या किमान एका सदस्याने तरी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेतलेले असावे.
१५) ट्रेकरूटच्या प्लॅनची माहिती घरच्या मंडळींनाही असावी. त्यामुळे संपर्क साधणे सोपे जाईल.
१६) छोट्या ट्रेकमध्येही एक किंवा दोन बॅटऱ्या तसेच स्वेटरही जवळ ठेवावा. उशीर झाल्यास कामी येऊ शकेल.
१७) वाट चुकलात तर एखाद्या सुरक्षित स्थळी थांबून राहणे केव्हाही योग्य. इतर जण तुम्हाला शोधू शकतील.
१८) नैसगिर्क आपत्तीबद्दल ग्रामस्थांच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्यावे. त्यांना त्याचे अचूक ज्ञान असते.
१९) आणि सगळ्यात महत्वाचे निसर्गाची काळजी घ्या.


आलेल्या पावसाळ्यातील तुमचे सगळे ट्रेक सुरक्षित, सुखरूप आणि धम्माल होवोत... !!

पाउलवाटाच्या सर्व वाचकांना पहिल्या पाउसाच्या खूप खूप शुभेच्छा


पाउलवाटाच्या सर्व वाचकांना पहिल्या पाउसाच्या खूप खूप शुभेच्छा…

निशांत पोतदार
(पाउलवाटा)

Tuesday, June 4, 2013

नमस्कार



नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

तुम्ही विचार करत असाल, बरेच महिने झाले आपल्या पाऊलवाटा ब्लॉग वर नवीन माहिती आली नाही आहे.  खरे म्हटले तर ऑफिसच्या कामात व्यस्त असल्यामुळे जास्त कुठे फिरणे झालेच नाही.

या पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार चालू आहे तर लवकरच  काहीतरी छान तुम्हाला वाचण्यासाठी घेऊन येइन.  तरी आपल्या पाऊलवाटा ब्लॉगला भेट देत रहा.

धन्यवाद,

निशांत पोतदार
(admin)
पाऊलवाटा 
nishantpotdar@gmail.com
BBM:29F1DE99




Monday, April 8, 2013

आपले नवीन फेसबूक पेज

 आपले  नवीन फेसबूक पेज MyClikography आणि पाऊलवाटा आवडले तर नक्की लाईक करा. 

नवीन ब्लॉग MyClikography 

धन्यवाद,

निशांत पोतदार 

Admin 

Thursday, January 24, 2013

नवश्या गणपती, नाशिक


 ६ जानेवारी २०१३
नवश्या गणपती, नाशिक

जवळच्या नातेवाइकाच्या लग्नाच्या निमित्ताने मला नाशिकला जायचा योग आला, सोबत बायको होती,म्हटले चला जाऊया गणपतीच्या दर्शनाला. माझा मित्र निलेश त्याची पत्नी प्रियांका आणि आम्ही दोघे असे कार्यक्रम आटपून दर्शनाला निघालो.
इंदिरा नगर नंतर अंबड सोडून पुढे नाशिक MIDC आतल्या रस्त्याने आम्ही नवश्या गणपतीच्या दर्शनाला आलो. रात्री पारा बराच खाली उतरला होता जवळ जवळ १० degree होता आणि रात्रीचे ९ वाजले होते.
मंदिराजवळ खूप शांतता होती बाहेरच गाडी उभी करून आम्ही दर्शनाला निघालो. नवश्या गणपतीचे नाव खूप ऐकले होते पण जाण्याचा योग काही येत नव्हता  तो आज आला तो पण जोडीने.
मंदिरा बद्दल जी माहिती मिळाली ती अशी.. आणि थोडी फार माहिती इंटरनेट वरून मिळाली.

पेशवे कालीन ऐतीहासिक नवश्या गणपती मंदिर हे आनंदवल्ली येथील अत्यंत जागृत असे देवस्थान आहे. नवश्या गणपती हा नवसाला पावतो असा अनुभव हजारो भाविकांना आलेला आहे. ह्या मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे.

इ.स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी ह्या मंदिराची स्थापना केली होती. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवल्ली हे गाव आजोळ होते व त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई ह्या देखिल नवश्या गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या.

राघोबा दादा व आनंदीबाई ह्यांना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झला व त्याचे नाव विनायक असे ठेवण्यात आले. ह्या मुलाच्या जन्मप्रित्यर्थ चावंडस गावाचे नाव बदलून आनंदवल्ली असे ठेवण्यात आले. ह्याच दरम्यान नवश्या गणपतीच्या मंदिराची उभारणी सुरु झाली. गोदावरीच्या तीरी पुर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेशाची मुर्ती आहे.

मुर्तीचे डोळे अतीशय सजीव असून मुर्ती आकर्षक आहे. ह्या गणेशाला चार हात असून त्यात पाश, मोदक, फूल आहे व चौथा हात आशीर्वाद दर्शविणारा आहे. प्रत्येक हातात कडे आहे. मूळ मुर्तीच्या डोक्यावर मुकूट आहे.

राघोबा दादांनी आनंदवल्ली येथे राजवाडाही बांधला होता, राजवाड्यात पश्विमेस उभे राहिल्यावर श्री नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडवली व राजवाडा जाळून टाकला. मात्र परीसरातील मंदिरे शाबूत राहिली. श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या करकिर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे.
मंदिराचा पत्ता: श्री नवश्या गणपती मंदीर,  गंगापूर रोड, आनंदवल्ली, नाशिक

असे म्हणतात कि आपला नवस बाप्पाच्या कृपेने पूर्ण झाल्यास मंदिरात घण्टा  बांधतात. अश्या अनेक घंटा मंदिरात आपल्याला दिसतात. मंदिराचे काढलेले काही फोटो आपल्यासोबत शेअर करत आहे.




नवश्या गणपती 
 प्रत्येकाने नक्की भेट द्या मंदिराला. बाप्पाच्या कृपेने माझ्या सर्व वाचकांनासुद्धा मंदिरात घंटा बांधण्याचा योग यावा अशी नम्र प्रार्थना करून आपला निरोप घेतो.
धन्यवाद...

निशांत पोतदार